Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - ठाकरेंना धक्का पण...

प्रजापत्र | Tuesday, 14/03/2023
बातमी शेअर करा

खरेतर राजकारणात ज्याच्या मागे काही लोक असतात किंवा जे स्वतःच्या जीवावर मोठे झालेले नेते असतात त्यांनी जर पक्षांतर केले तर त्याचा परिणाम राजकारणावर होत असतो. मात्र केवळ कोणाचा तरी पती, कोणाचातरी मुलगा याला एका पक्षातून दुसर्‍या पक्षात घेतले तर त्याचा परिणाम राजकीय चित्र बदलण्यावर शून्य असतो. भुषण देसाईच्या बाबतीत यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल असे नाही. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या मुलाला इतर पक्षात जावे वाटावे हा त्यांच्यासाठी नक्कीच धक्का आहे. पण भुषण देसाईंना घेवून शिंदेंचा काय फायदा होणार आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज एक नवा विनोद होताना दिसत आहे. कोणाचा तरी चालक एका पक्षातून दुसर्‍या पक्षात गेला म्हणजे जणू काही राज्याच्या राजकारणाला फार मोठा हादरा बसणार आहे असे चित्र निर्माण केले जात आहे. कोणी 30-40 वर्षापासूनचा कर्मचारी थेट दुसर्‍या पक्षात प्रवेश करतो म्हणजे जणू काही राजकीय भूकंप आला असे भासविण्याची जी राजकीय चेष्टा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे तसा प्रकार देशात इतरत्र क्वचितच होत असावा. त्यातही उद्धव ठाकरे गटातून कोणी शिंदेंकडे जाणार असेल तर मग विचारायलाच नको, जणूकाही त्या व्यक्तीच्या मागे लाखो लोक आहेत आणि आता फार मोठा जनाधार त्या व्यक्तीमुळे तो प्रवेश करत असलेल्या पक्षाला मिळत आहे. असे जे भासविले जात आहे तो निव्वळ राजकीय भणंगपणा आहे.
यापूर्वी सुष्मा अंधारेंच्या संदर्भात त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नातेवाईकाच्या शिंदे गटातील प्रवेशावरून असेच राजकीय नगारे मोठ मोठ्याने वाजविले गेले होते. बाळासाहेबांची सेवा केलेल्या थापाने ज्यावेळी राजकीय वक्तव्य केले त्यावेळी देखील असाच राजकीय भांगडा केला गेला. आता भूषण देसाई हे त्याच नाट्यातले पुढचे पात्र आहे. सुभाष देसाईंचा मुलगा ही ओळख सोडली तर भूषण देसाई हे नाव देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला माहित असण्याचे काहीच कारण नव्हते. सुभाष देसाई हे शिवसेनेचे फार जुने शिलेदार आहेत. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्‍वासू आहेत, असे असले तरी शिवसेनेतील इतर नेत्यांची मुले जशी राजकारणात सक्रीय होती तसे भूषण देसाईच्या बाबतीत सांगण्यासारखे नक्कीच नव्हते. शिवसेनेतील नेत्यांच्या लेकरांनी किमान युवासेनेत चमक दाखविली होती. भूषणच्या बाबतीत तसेही काही सांगण्यासारखे नाही. अगदी भूषण शिंदे गटात प्रवेश करणार आहे हे कळेपर्यंत भूषण देसाई या व्यक्तीची दखल घ्यावी असे महाराष्ट्राला वाटण्याचे काहीच कारण नव्हते पण केवळ आम्ही उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या घरात देखील राजकीय सुरूंग लावू शकतो हे दाखविण्यापलिकडे भूषण देसाईंचा शिंदेंच्या शिवसेनेला फार काही उपयोग होईल असे सांगण्यासारखी परिस्थिती नाही.
मुळात सुभाष देसाई हे जरी उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय असले तरी सुभाष देसाई हे स्वतः कधीच मासलिडर म्हणून समोर आलेले नाहीत. सुभाष देसाई ज्या काही निवडणुका जिंकले त्यामागे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वलय हेच एकमेव कारण राहिलेले आहे. मग जिथे स्वतः सुभाष देसाईच कधी मासलिडर नव्हते तेथे राजकारणाचा कोणताही गंध नसलेल्या त्याच्या दिवट्याच्या पक्षप्रमुखाने महाराष्ट्राच्या राजकारणात असे काय बदल घडणार आहेत? एखाद्याचे घर फोडल्याच्या समाधानापलिकडे यातून महाराष्ट्राच्या राजकारणावर असा कोणता दुरागामी परिणाम होणार आहे? मात्र भाजपच्या वळचणीला गेल्यापासून एकनाथ शिंदेंनाही कोणत्याही गोष्टीचा महोत्सव करण्याची तशी सवयच लागली आहे. त्यामुळे देसाईंचे भूषण आजजरी शिंदेंना भूषण वाटत असले आणि त्यावरून उद्धव ठाकरेंना दुषणे देता येणार असली तरी भूषण देसाईच्या पक्ष प्रवेशाचा ना शिंदेंना फायदा आहे ना महाराष्ट्रावर त्याचा परिणाम.

Advertisement

Advertisement