Advertisement

एकनाथषष्ठीनिमित्त पैठण यात्रेसाठी जिल्ह्यातून ९६ बसेस

प्रजापत्र | Monday, 06/03/2023
बातमी शेअर करा

बीड - पैठण येथील नाथषष्ठी यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळही सज्ज झाले असून बीड जिल्ह्यातील आठ आगारातून भाविकांच्या सोयीसाठी ९६ बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली. ११ ते १७ मार्च या कालावधीत पैठण येथे यात्रा उत्सव असल्याने ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. राज्यातील महत्त्वाची यात्रा समजल्या जणाऱ्या पैठण नाथ षष्ठी यात्रेला ११ मार्चपासून सुरूवात होणार आहे.या यात्रेनिमित्त राज्यातून हजारो वारकरी नाथनगरीत दाखल होत असतात.विशेष म्हणजे पैठणनगरीत तब्बल साडेचारशेपेक्षा अधिक दिंड्या दरवर्षी येतात.मागच्या ४०० वर्षांहून अधिक काळापासून पायी दिंडीची परंपरा देखील कायम असून जिल्ह्यातील भाविकांना दर्शनासाठी आठ आगारातून ९६ बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये बीड-१५, परळी-८, धारूर ९, माजलगाव-८,गेवराई-२०,पाटोदा-९,आष्टी-१२,अंबाजोगाईमधून १५ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान ज्या गावातून ४० गावकरी एकत्रित पैठणच्या यात्रेसाठी जाण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी थेट गावातून बस सोडण्यात येईल असेही श्री.मोरे यांनी म्हटले आहे.

 

 मागच्या वर्षी ३१ हजार भाविकांनी घेतला लाभ एकनाथषष्ठीनिमित्त पैठण येथे भाविकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.२०२० आणि २०२१ साली कोरोनामुळे या यात्रेवर निर्बंध होते.मात्र मागच्या वर्षी निर्बंध हटविण्यात आल्यानंतर ५२ बसेसच्या माध्यमातून ३१ हजार भाविकांनी बससेवेचा लाभ घेतला होता.यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत ज्यादा बसेस सोडण्यात येणार असल्याने भाविकांनी या यात्रेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

Advertisement

Advertisement