बीड - 2014 नंतर गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. तर दुसरीकडे शेतकर्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. गॅसची किंमत कमी करावी आणि कांद्याला भाव द्यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर चुलीवर कांदा भजे आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने महिलांच्या डोळ्यात धूर जाऊ नये म्हणून उज्वला गॅस योजना राबविली. मात्र आता गॅस सिलेंडरचे भाव प्रचंड वाढले आहे. हे भाव सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरील आहेत. दुसरीकडे सतरा-अठरा गोण्या विकूनही हाती एक रुपया येत असेल तर सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करावेत, शेतकर्यांच्या मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, किस्किांदा पांचाळ, सय्यद सालेहा, शेख युनुस, मिलिंद सरपदे, बलभीम उबाळे, शेख मुबीन, शेख मुश्ताक, रमाकांत रेवणवार यांच्यासह आदींनी कांदा भजी आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्या-ंमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांना दिले.