बीड दि.2 ( प्रतिनिधी ) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 अंतर्गत 4 मार्चपासून आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह साजरा केला जाणार आहे.या वर्षी महाराष्ट्रातुन शेख मन्नाबी मुजफ्फर पटेल ( सरपंच ,नांदूर हवेली ता.बीड ) यांची स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 साठी निवड झाली आहे. उद्या दि.4 मार्च रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सरपंच मन्नाबी पटेल या पटेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहेद पटेल यांच्या आई आहेत. भारत सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. संदीप क्षीरसागर ,अमरसिंह पंडीत,यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी केकान आदींनी अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील नांदूर हवेली- हिंगणी हवेली - खामगाव - जप्ती पारगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मन्नाबी मुजफ्फर पटेल यांनी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कामात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाकडून घेण्यात आली आहे. स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 या राष्ट्रीय पुरस्कारासाठी मन्नाबी पटेल यांची निवड झाली आहे. सरपंच शेख मन्नाबी मुजफ्फर पटेल यांनी आपल्या गावातील नळपाणी योजनेच्या संचालन व देखभालीचे उल्लेखनीय काम केले आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन, घरोघरी भेटी देत पाणीपुरवठाच्या महत्त्व पटवून दिले. गावातील शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहचवले. प्रत्येक घराला मिळालेल्या पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्तेचे निरीक्षण केले. त्यांच्या या प्रशंसनीय कार्यामुळे त्यांना भारत सरकारच्या श्रेणीत नामांकन मिळाले असून स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 करिता त्यांची निवड झाली आहे. उद्या दि. 4 मार्च रोजी दिल्लीत त्यांचा सन्मान होणार आहे.