Advertisement

सांगताही येईना , सहनही होईना ' ; 'कमल'दलात वाढतेय अस्वस्थता

प्रजापत्र | Tuesday, 28/02/2023
बातमी शेअर करा

ऑफ द रेकॉर्ड / संजय मालाणी

बीड दि. २७ : भ्रमराने कमळाला मोहिनी घालणे आणि कमळाने त्याच भ्रमराला आपल्या पाकळ्यांमध्ये घट्ट मिटून घेणे ही निसर्गातली सुखद कल्पना . त्यातही कळस म्हणजे मोठ्यात मोठे लाकूड पोखरण्याची क्षमता असलेला भ्रमर कमळाला मात्र पोखरत नाही, तर त्याच्या पाकळ्या उघडण्याची वाट पाहत राहतो. निसर्गातली ही कल्पना राजकारणात मात्र सध्या एकदम उलटी झाली आहे. महाराष्ट्रात कमलदलानेच अनेक 'भ्रमरा'ना रुंजी घातली आहे. त्या भ्रमरांना आपल्यात सामावून देखील घेतले आहे. मात्र आता त्याचा त्रास कमळाच्या पाकळ्यांना होत आहे. मात्र वरिष्ठांनीच भ्रमराला सामावले , आता त्रास झाला तरी सांगायचे कोणाला , आणि सहन तरी करायचे किती अशी अवस्था महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांची झाली आहे. विरोध करण्याची हिम्मत नाही आणि सहन करण्याची क्षमता नाही, अशावेळी करावे तर करावे काय ? या विवंचनेत भाजपचे आमदार आणि पदाधिकारी आहेत.

'महाशक्तीने ' एकनाथ शिंदेंच्या मदतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि नंतर शिंदे फडणवीसांचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले त्यावेळी भाजपच्या आमदारांना आपण सत्ताधारी झाल्याचा कोण आनंद झाला होता. एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनाच पोखरली आणि आता भाजपच्या 'कमलदला'च्या आश्रयाला ते आले, त्यावेळी त्यांचे रुंजन देखील भाजपला गोड वाटत होते. त्यातच थेट 'मोटाभाई'च्या इच्छेने हे सारे होत असल्याने कोणी तक्रार करण्याचे देखील तसे काही कारण नव्हते.

मात्र आता शिंदे गट आणि भाजपचा प्रेमाचा गुलकंद भाजपच्या अनेक आमदारांसाठी मात्र कडू गोळी ठरत आहे. राज्यात मुख्यमंत्री शिंदे गटाचा , त्यामुळे त्यांच्या आमदारांना कायम झुकते माप, ते आमदार सांभाळून ठेवायचे, त्यांची मर्जी सांभाळायची , म्हणून त्यांच्या मतदारसंघात निधीच निधी. त्यांच्या आमदारांचे एकवेळ ठीक, पण शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर देखील सरकारची विशेष मर्जी , त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या आमदारापेक्षाही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीला अधिक 'भाव ' असे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. अगदी भाजपच्या आमदारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून एखादा अधिकारी आला असेल, मात्र ते शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना रुचत नसेल, तर लगेच त्या अधिकाऱ्याच्या तक्रारी आणि त्याची चौकशी देखील लावली जाते . मग आमच्या शिफारशींचा किंमतच नाही का असा प्रश्न भाजपच्या अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना राज्यात ठिकठिकाणी पडत आहे. त्यामुळेच आजघडीला भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

'आम्ही काही गुवाहाटीला जाऊ शकत नाही. गुवाहाटी सोडा, आम्ही काही बोलूही शकत नाही. काही बोलायला जावे तर 'महाशक्ती ' तुम्हाला माहीतच आहे. पण हे जे काही चाललंय ते सहनही होत नाही. आमच्यापेक्षा इतरांना जास्त संधी, निधी, त्यांचीच चलती . ते कानामागून येऊन तिखट झाले, पण आम्हालाही निवडणुकीला सामोरे जायचे आहे, पण नेत्यांना सांगावे कोणी ' अशी खदखद बहुतांश भाजप आमदार आणि पदाधिकारी खाजगीत, ऑफ द रेकॉर्ड बोलून दाखवीत आहेत. पण महाशक्तीला हे सांगायचे कोणी ?

Advertisement

Advertisement