शिरुर कासार :संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना साथरोगाचा सामना करण्यासाठी तालुक्यातील २९५ कर्मचारी अहोरात्र लढा देत असून त्या मध्ये महसूल,आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.तीन यंत्रणा हातात हात घालून कोरोनाशी दोन हात करत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी व्यवस्थितपणे नियोजन करत असल्यामुळे आतापर्यंत एकही संशयित नागरिक या आजाराशी संबंधित आढळून आला नाही.तालुक्याचे प्रमुख असलेले तहसीलदार श्रीराम बेंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी आणि सहपोलिस निरीक्षक सुरेश खाडे यांच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन चेक पोस्टवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी केली आहे
.तालुक्यातील मानूर-चिंचपूर या चेकपोस्टवर बीड आणि अहमदनगर येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे तर मातोरी येथील दुसऱ्या चेकपोस्टवर राष्ट्रीय महामार्ग 222 वरील रहदारी करणाऱ्या नागरीकांची तपासणी होत आहे.एका चेकपोस्ट वर तीन शिफ्ट मध्ये कर्मचारी काम करत असून पाच जणांची टीम नागरिकांची तपासणी करत आहे.ज्या मध्ये दोन शिक्षक,दोन पोलीस आणि एका आरोग्यसेवकाचा समावेश आहे.20 मार्च पासून चेकपोस्ट वर तपासणी सुरू असून मानूर-चिंचपूर चेकपोस्ट वर आतापर्यंत 384 तर मातोरी चेकपोस्ट वर 4673 अशा एकूण 5057 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असून ज्या मध्ये शिरुर कासार आणि खालापुरीचा समावेश आहे.रायमोहा येथे ग्रामीण रुग्णालय असून त्या ठिकाणी असलेले कर्मचारी गावोगावी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहेत.ग्रामीण रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांनी हि मोहीम हाती घेतल्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागात या आजारावर प्रतिबंध घालण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने शिरुर आणि खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह चार वैद्यकीय अधिकारी,चार आरोग्य सहाय्यक,चार आरोग्य सहाय्यीका,तीन आरोग्य सेवक,चार आरोग्य सेविका,दोन विस्तार अधिकारी,सातकंत्राटी आरोग्य सेविका,एकशे तेहतीस आशा,सात गटप्रवर्तक,एक तालुका आरोग्य सहाय्यक आणि एक कनिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे.तर रायमोहा ग्रामीण रुग्णालयांतर्गत तीन वैद्यकीय अधिकारी,सात परिचारिका,लिपिक तीन,शिपाई चार,प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन आणि कंत्राटी दोन अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.पोलीस विभागाच्या वतीने दोन सहपोलिस निरीक्षक,एक पोलीस उपनिरीक्षकासह 28 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सहकार्य करत आहे.
---
महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये.स्वच्छता पाळणे गरजेचे असून शेजारच्या लोकांशी संपर्क टाळावा.अफवा पसरवू नये.कायद्याने गुन्हा असून आरोग्य यंत्रणा आलेले संकट दूर करण्यासाठी सक्षम आणि सतर्क आहे.नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच योगासने आणि व्यायाम करावा
डॉ.अशोक गवळी, -तालुका आरोग्य अधिकारी
----
रायमोहा ग्रामीण रुग्णालयात 10 बेडचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.ऑक्सिजन सिलेंडर,सक्षन मशिन,आवश्यक औषध-गोळ्या आणि तीन लोकांचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे.गरजेनुसार तो वाढविण्यात येईल.
एस.एस.वाघमारे,वैद्यकीय अधीक्षक,रायमोहा
---
मार्किंग लावून जीवनावश्यक वस्तू विकाव्यात
जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी आपल्या वस्तू किमान तीन फुटांच्या अंतरावरून विकाव्यात.सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ग्राहकांनी आवश्यक असणारा माल भरावा.शहरातील दुकानदारांना सूचना केल्याप्रमाणे त्यांनी आपल्या दुकानात तीन फुटांवर दोरी लावली आहे.दुकानदार आणि ग्राहक सूचनांचे पालन करत आहेत.
श्रीराम बेंडे,तहसीलदार,शिरुर
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment