Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - पश्‍चात बुध्दी का अपरिहार्यता?

प्रजापत्र | Tuesday, 07/02/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागच्या काही काळातील विधानांकडे लक्ष दिले तर ही विधाने संघाची जी काही प्रतिमा जनमानसात आहे त्या प्रतिमेला तडा देणारी निश्‍चितच आहेत. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनुवादी व्यवस्थेच्या पालख्या वाहण्याचे काम केले आणि ज्यांच्या विचारप्रणालीमुळे समाजातले जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले ती विचारधारा आता  ‘जाती पंडितांनी निर्माण केल्या’ या भूमिकेवर येत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र संघ परिवाराची ही भूमिका केवळ सरसंघचालकांच्या भाषणापुरती मर्यादित न राहता ती कृतीत उतरणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. संघाच्या दृष्टीने आज घेतली जात असलेली भूमिका कदाचित पश्‍चात बुध्दी असेल परंतु संघाला जर टिकायचे असेल तर ही त्यांची अपरिहार्यतादेखील आहे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘जाती देवाने निर्माण केल्या नाहीत, त्या पंडितांनी निर्माण केल्या, देवासाठी सर्व एक आहेत’ असे विधान केले आहे. आजच्या परिस्थितीत मोहन भागवतांचे हे विधान काहीसे धाडसी वाटू शकते परंतु संघ परिवाराचा इतिहास पाहिला तर जगाला दाखवायला अशी विधाने अधूनमधून करणे हा संघाचा पायंडा आहे. देवाला सर्व सारखे आहेत या धाटणीचे विधान संघ परिवाराकडून पहिल्यांदा होत आहे असेही नाही. अगदी चारपाच दशकाच्या अगोदर संघ परिवारातील एक असलेल्या विश्‍व हिंदू परिषदेने उडुपीच्या धर्मसंमेलनात ‘हिंदवा सहोदरा सर्वे:’ अशी हाक दिली होतीच. पण एकीकडे अशी हाक द्यायची आणि दुसरीकडे गोळवलकरकृत ‘बंच ऑफ थॉटस्’ अर्थात विचारधनाला प्रमाण मानायचे असा दुटप्पीपणा संघपरिवाराच्या वाटचालीत अनेकदा दिसलेला आहे. गोळवलकरांनी आपल्या बंच ऑफ थॉटस् मध्ये जातीव्यवस्था आणि विषमतेचे समर्थनच केले आहे. संघ परिवाराला समता देखील मान्य नाही. समरसतेच्या गोंडस नावाखाली एक वेगळा विचारप्रवाह कसा राहील हे पाहण्याचे काम या परिवाराच्या माध्यमातून झालेले आहे. त्यामुळे पहिल्याप्रथम तर मोहन भागवतांच्या विचारामुळे फारच हुरळून जाण्याचे देखील आवश्यकता नाही.
अर्थात जर संघ परिवाराला खरोखरच स्वत:ला बदलायची इच्छा झाली आहे असे काही काळ समजून घेतले तरी अशी इच्छा निर्माण होणे म्हणजे संघाची मानसिकता बदलली आहे असे समजण्याचे देखील काहीच कारण नाही. मागच्या दोनतीन दशकात बहुजन समाजामध्ये जी जागृती झाली आहे, संघ परिवाराबद्दल जी खरीखुरी माहिती समोर येत आहे आणि वर्णवर्चस्ववादाच्या विकृतीला विरोध करण्यासाठी मागच्या काही काळात जे समाजमन व्यापक होत चालले आहे ते पाहता केवळ एका वर्गाचा अजेंडा रेटणे यापुढे तितकेसे प्रभावी होणार नाही हे ओळखण्याइतपत संघ परिवारातील धुरीण चाणाक्ष्य नक्कीच आहेत. जर संघ परिवाराला आपला परिघ वाढवून स्वत:चे महत्त्व कायम ठेवायचे असेल तर आता या देशातील बहुजन समाजाला आपलसं केल्याशिवाय पर्याय नाही. हे संघ परिवाराने देखील ओळखले आहे. आज भलेही मोदींचे सरकार आमच्यामुळे आले असा दावा संघ परिवार करीत असेल (जो खराही आहे) आणि संघाच्या विचाराचे सरकार आणण्याइतपत परिस्थिती निर्माण करण्यासाठी संघाला किमान ९ दशकांची वाट पाहावी लागली हे लक्षात घेतल्यानंतर आजही मोदींचे सरकार आले असले तरी मोदी विरोधाचा टक्का देखील मोठा आहे. हा टक्का अर्थातच संघ विरोधाचा देखील आहे. मात्र तो विखुरलेला असल्याने त्याचा राजकीय परिणाम दिसत नाही. आता हाच विखुरलेला टक्का एकत्र आणण्याचे प्रयत्न विविध राजकीय पक्षांच्या पातळीवर होवू लागलेले आहेत. त्यामुळेच आता संघाला देखील आपले ‘सोवळेपण’ बाजूला ठेवणे ही त्यांची राजकीय मजबुरी आहे. संघ थेट राजकारणात उतरत नाही असे जरी सांगितले जात असले तरी राजकारणावर प्रभाव टाकण्यात आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्यात संघ परिवाराने धन्यता मानलेलीच आहे. त्यामुळेच राजकीयदृष्ट्या आपले महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर आता आपला सामाजिक पाया अधिक भक्कम करणे आणि त्यासाठी सोवळेपण काही काळ खुंटीला टांगून ठेवणे ही संघाची गरज आहे. कदाचित त्याच गरजेतून मोहन भागवत आता संघाचा वेगळा चेहरा जगाला दाखवू इच्छित असतील. यामागे संघाला पश्‍चाताप झाला आहे यापेक्षाही अधिक ती संघाची अपरिहार्यता बनलेली आहे.

Advertisement

Advertisement