Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - प्रधानसेवकांचं मौन

प्रजापत्र | Tuesday, 31/01/2023
बातमी शेअर करा

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना, ज्यावेळी देशाशी संबंधित एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा व्हायची, किंवा एखादा असा विषय समोर यायचा, त्यावेळी मनमोहनसिंगांनी त्यावर बोललं पाहिजे अशी अपेक्षा भाजपची असायची . ते फार बोलत नाहीत म्हणून त्यांची 'मौनी पंतप्रधान ' म्हणून संभावना करण्यात देखील भाजपची मंडळी आघाडीवर असायची. आता मात्र देशाचे विद्यमान पंतप्रधान, राष्ट्रपुरुष म्हणून ज्यांना भक्त मंडळी प्रोजेक्ट करीत असतात , त्या नरेंद्र मोदींचे मित्र असलेल्या अडाणी समूहाचे वास्तव 'हिंडेनबर्ग ' च्या अहवालातून समोर आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गळ्याला फास लागेल असा भीषण अहवाल समोर आला आहे, त्यामुळे शेअर बाजार कोसळला आहे. सारेच गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत, मात्र अशावेळी देशाचे पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. इतरवेळी 'मन की बात ' आणि 'परीक्षा पे चर्चा ' करणारे बोलघेवडे पंतप्रधान आता देशाच्या अर्थव्यवस्थेचीच परीक्षा पाहणारी वेळ आलेली असताना मौन का पाळून  आहेत ?

देशाचे पंतप्रधान असलेल्या , भक्त मंडळींच्या ह्रदयातील 'राष्ट्रपुरुष , विकासपुरुष ' असलेल्या नरेंद्र मोदींची गौतम अडाणी यांच्यासोबतची मैत्री जगजाहीर आहे. कृष्ण द्वारकेचा राजा झाल्यानंतर त्याने जशी आपला मित्र सुदाम्यावर  होती, आणि सुदाम्याचे आयुष्य सोनेरी करून टाकले होते तसेच काहीसे मोदींच्या 'अमृत काळात ' गौतम अडाणींच्या  बाबतीत झालेले केवळ देशाने नाही तर जगाने पहिले. अगदी ऑस्ट्रेलियामध्ये देखील मोदी -अडाणी मैत्रीची महती आजही गायली जाते , तिथे देशातील वातावरणाचे काय सांगावे ? अडाणींसाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनेच आपली तिजोरी सताड उघडल्यानंतर इतर बँकांची अडाणींना विरोध करण्याची बिशाद ती काय असणार ? एकीकडे एसबीआयची अवस्था अशी असतानाच दुसरीकडे एलआयसीसारखी संस्था सुद्धा पंतप्रधानांच्या या मित्रासाठी गुंतवणुकीच्या पायघड्या अंथरण्यात धन्यता मानीत होती . देशातील उद्यमशीलता वाढावी या पवित्र हेतूने हे झाले असते, आणि त्यातून देशाची जागतिक बाजारात फार मोठी पत वाढणार असती, देश खरेच 'विश्वगुरू ' होणार असता तर यात काही वावगे देखील नव्हते.
मात्र बाहेर राष्ट्रवादाचा आव आणून आपण फार श्रीमंत आहोत असे दाखविणारा पंतप्रधानांचा हा मित्र काय करीत होता तर ' आपल्या उद्योग समूहाची किंमत फुगवत होता. शेअरची किंमत वाढवीत होता, एक फुगा सरकारी गुंतवणुकीची हवा भरून नको तितका फुगविला जात होता ' आता त्या फुग्याला 'हिंडेनबर्ग' च्या अहवालाची सुई लागली आहे. आणि क्षणात या फुग्यातील हवा निघून जात आहे. मागच्या तीन दिवसात शेअर बाजारात अडाणी समूहाच्या समभागांची जी घसरगुंडी सुरु आहे, त्यातून एलआयसी सारख्या, एसबीआयसारख्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. हा फटका हजारो कोटीतील आहे. आता यावरदेखील एलआयसीसारखी संस्था अजूनही 'आम्ही अडाणी समूहात जे गुंतविले ते आमच्या एकून मालमत्तेच्या १ % इतकेच आहे, त्यामुळे विमाधारकांच्या पैशांवर  काही परिणाम होणार  नाही' अशी मखलाशी करीत आहे. मात्र असला खटाटोप एलआयसीच्या कोणाच्या सांगण्यावर केला हे एलआयसी सांगत नाही. हिंडेनबर्गच्या अहवालाला उत्तर देताना जी भूमिका अडाणी समूहाने घेतली आहे , ती तर निव्वळच बाळबोध आहे.  या कंपनीनं आपला अहवाल तयार करण्यासाठी कुठलाही रिसर्च केलेला नाही, त्यांनी आमचे डिस्क्लोजर्स केवळ कॉपी पेस्ट केले आहेत अशी भूमिका अडाणी समूहाने घेतली आहे. मात्र यामुळे शेअर बाजारातली अडाणींच्या समभागांची घसरगुंडी थांबलेली नाही. आणि उद्या अडाणींचा 'मल्ल्या ' झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेबोवतीचा फास अधिकच घट्ट होणार आहे . तसे  कोणी सांगायला तयार नाही.
इतरवेळी छोट्या छोट्या गीष्टीवर मन की बात करणारे , विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा ' करणारे ५६ इंच छातीवाले आपले पंतप्रधान, मनमोहनसिंगांसारख्या व्यक्तीची 'मौनी पंतप्रधान ' म्हणून संभावना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. आज चार दिवसांपासून हिंडेनबर्गच्या अहवालाने जगभरात खळबळ माजविली आहे. देशातील एसबीआयच्या ठेवीदारापासून एलआयसीच्या विमाधारकापर्यंत, अडाणींच्या संभागधारकापर्यंत सारेच अस्वस्थ असताना आपल्या जिवलगाच्या या 'कर्तृत्वावर ' मोदी काहीच का बोलत नाहीत. देशात संपुआचे सरकार असताना मनमोहनसिंगांचे मौन हे त्यांच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला मूक समर्थन आहे का ? असा सवाल भाजपवाले हमखास विचारायचे. आता हिंडेनबर्गचा अहवाल आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती यावरचे मोदींचे मौन हे आपल्या मित्राच्या 'कर्तृत्वाला ' मोदींचे मूक समर्थन मानायचे काय ? 

Advertisement

Advertisement