बीड - पत्नीच्या छातीवर, कानावर सपासप वार करून तिची हत्या केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पतीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले असुन फिर्यादीच्यावतीने सरकारी वकील अॅड.अनिल धसे यांनी न्यायालयासमोर प्रभावीपणे बाजु मांडली. बीड तालुक्यातील बोरखेड येथे 10 ऑक्टोबर 2020 रोजी नगीना शहाजी काळे (वय 25) यांच्यावर चाकुने सपासप वार करून त्यांचा खुन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मयत विवाहीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा पती शहाजी शहात्तर काळे (32) यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा नेकनुर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. नगीना हीचा 9 वर्षापुर्वी शहाजी सोबत विवाह झाला होता. मात्र दोघांमध्ये नेहमीच वाद होत असे.
त्यामुळे दि.8 ऑक्टोबर 2020 रोजी नगीना माहेरी निघुन गेल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी शहाजी काळे हा नगीनाच्या माहेरी आला व मला न विचारता तु माहेरी का आलीस ? असे म्हणुन तिच्या अंगावर सपासप वार केले. यामध्ये नगीना हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आज दुपारी बीड येथील न्यायालयात अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. याप्रकरणात एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये डॉ.शिवणीकर यांची साक्ष महत्वाची ठरली. फिर्यादीचे सरकारी वकील अॅड.अनिल धसे यांनी मांडलेली बाजु आणि साक्षी-पुरावे पाहता न्यायालयाने आरोपी शहाजी शहात्तर काळे याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी स.पो.नि.भारत बलय्या, पीएसआय.गोडे, जमादार परमेश्वर सानप तसेच ड्युटी पीएसआय बी.बी.जायभाये यांनी सहकार्य केल्याचे अॅड.धसे यांनी सांगितले.
बातमी शेअर करा