Advertisement

कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे खूनच

प्रजापत्र | Wednesday, 25/01/2023
बातमी शेअर करा

पुणे जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भिमा नदीत 7 जणांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. मुलाने पळून जाऊन लग्न केल्याने संबंधित कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. तीन चिमुरड्यासह सात जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पवार कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा अपघात करुन त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्यातून त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील 7 जणांची हत्या करुन त्यांचे मृतदेह भिमा नदी पात्रात फेकल्याचे तपासात समोर आले आहे.

या कारणामुळे खून

याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ),प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपींचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत सदर मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, चार दिवस ही बाब पवार कुटुंबाने मुलाच्या पालकांना सांगितले नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा आपल्या मुलाचा खून हा पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला.

गावी जाण्याच्या बहाण्याने भीमा नदीजवळ नेले

घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबीयांना गावाला जाऊ असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदी पात्राच्या जवळ गेले. तेथे आरोपींनी 7 जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नेमके कशाप्रकारे आरोपींनी मयताना मारले, त्यांच्या खुना मागे नेमके अजून कोणते इतर कारण आहे, याबाबत पुणे ग्रामीण पोलीस यांची स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहे.

Advertisement

Advertisement