Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - उशिरा सुचलेले शहाणपण

प्रजापत्र | Tuesday, 24/01/2023
बातमी शेअर करा

खरेतर भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात आले ,तेव्हाच  त्यांचे वय अध्यात्मचिंतनात आयुष्य कंठीत करण्याचे होते . म्हणजे ज्या वयात  खरेतर कोश्यारींनी वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा होता, त्यावेळी त्यांनी राजस सुखाला प्राधान्य दिले आणि महाराष्ट्राच्या राजभवनातून त्यांच्यातील तामसी वृत्तीच काय ती दिसली. महामानवांचे प्रतिमाभंजन असेल किंवा कुटील राजकीय खेळ्या , यातून कोश्यारी यांनी राज्यपाल कसा नसावा याचा वस्तुपाठ घालून दिला. धन्याच्या सुचणे बरहुकूम कारभार करणाऱ्या कोश्यारी यांना आता पदमुक्त व्हायचे लागलेले डोहाळे हे केवळ उशिरा सुचलेले शहाणपणच नाही, कोश्यारींच्या हाताने करायचे तितके करून घेतल्यानंतर त्यांची उपयुक्तता किमान महाराष्ट्रात तरी भाजपच्या दृष्टीने संपलेली आहेच.म्हणूनच आता कोश्यारींनी राज्यातील सरकारच्या अडचणी दूर करण्याचा मार्ग देखील खुला केला आहे.

 

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  दिली, त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारी पायउतार होतील असे अपेक्षिले जात आहे. खरेतर कोश्यारी यांनी मनन चिंतनाचे दिलेले कारण किती तोकडे आहे, याची जाणीव सर्वांनाच आहे. कारण कोश्यारी यांना खरेच मनन , चिंतन करायचे होते, तर उत्तराखंडच्या सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यापासून त्यांनी तेच करायला हवे होते.  तर किमान महाराष्ट्रात महापुरुषांचे प्रतिमाभंजन  मात्र कोश्यारी यांच्यातील राजकारणी  नव्हता. त्यातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तर जणू कोश्यारी यांच्या राजकीय आकांक्षांना नव्याने घुमारे फुटले. पर्यायी सरकार चालिवल्याप्रमाणे राज्यपाल वागत होते. लोकशाही व्यवस्थेच्या कोणत्याच संकेतात न बसणारे वर्तन करीत केंद्रातल्या मोदी सरकारला खुश करणारी कृती कोश्यारी करीत गेले. धन्याला खुश करण्यासाठीच कोश्यारी झटत असल्याने त्यांचे सारे प्रमाद केंद्र सरकारने देखील पोटात घातले.
आता राज्यात भाजपच्या आश्रितांचे सरकार आहे. खरेतर भाजपचेच सरकार आहे असेही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे असेही कोश्यारी यांना करण्यासारखे काही राहिलेले नाही. कोश्यारी यांचा मूळ पिंडच उत्साही राजकारण्यांचा , आणि आता महाराष्ट्रात तसे काही करता येणार नाही. प्रति सरकार चालविता येणार नाही, याची जाणीव कोश्यारी यांना आहेच. दुसरी बाजू आहे सरकारची. आतापर्यंत महाविकास आघाडीला छळणारे कोश्यारी सध्या शिंदे फडणवीस सरकारसाठी देखील  त्यांच्या काळात विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न त्यांनी ताटकळत ठेवला. आता शिंदे फडणवीस सरकारला, आपल्या मर्जीतले आमदार विधानपरिषदेवर घ्यायचे आहेत. मात्र हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. अशावेळी जर राजभवनात कोश्यारीच पाहणार असतील तर सर्वोच्च न्यायालयात सरकार अडचणीत येण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे एकदा का कोश्यारी बाजूला झाले, की मग नवीन येणारे राज्यपाल , जुन्यांनी काय केले हे मला माहित नाही असे सांगून आता १२ सदस्य नियुक्त करायला मोकळे , हा देखील एक विषय आहेच. दुसरे , राज्यातील सरकारचा फैसला अजून सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे. तेथे देखील राज्यपालांच्या भूमिकेची चिरफाड होणारच, त्यामुळे देखील आता कोश्यारींच्या हाताने करायचे तितके करून घेतल्यानंतर त्यांची उपयुक्तता किमान महाराष्ट्रात तरी भाजपच्या दृष्टीने संपलेली आहेच. म्हणूनच आता पदमुक्त होण्याची 'मन की बात' कोश्यारी यांना सुचली असावी. उद्या कदाचित कोश्यारी महाराष्ट्रातून पदमुक्त होतील , त्यांचे भविष्यात कोठे तरी पुनर्वसन देखील होऊ शकतेच. मात्र सध्या तरी पदमुक्तीची कोश्यारींना लागलेली आस हे एक तर उशिरा सुचलेले शहाणपण आहेच, पण त्यासोबतच सरकारला अडचणीतून नबाहेर काढण्याची खेळी सुद्धा आहे. 

Advertisement

Advertisement