किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर ) धारुर शहरात अंबेजोगाई रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी सोने उजळून देतो म्हणून चक्क सोन्याची दागिने लंपास करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणाची माहिती मिळताच धारूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
शहरातील आडस अंबेजोगाई रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागा मध्ये गुरुवारी (दि.१९) दुपारी घरा समोर दोन महिला बोलत उभ्या असताना दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन तुमचे सोने उजळून देतो व कमी दरात देतो असे म्हणून त्या महिलांच्या घरात प्रवेश केला. सोने उजळण्याची पावडर टाकून सोने गॅसवर ठेवल्याचे दाखवले. मात्र हे चोरटे शेजारून आम्ही जाऊन येतो असे म्हणून त्या घरातून निघून गेले. त्या महिलांनी थोड्या वेळा नंतर उकळत्या पाण्यात पाहिले असता सोने नसल्याचे निदर्शनास आले. या चोरट्यांनी हे सोने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. दीड तोळे सोने या चोरट्यांनी लंपास केल्याचे या महिलांनी सांगितले. या प्रकरणी धारूर पोलीस शेजारचे सीसीटीव्ही कॅमेरा वरून संबंधित चोरट्याचा तपास घेत असून रात्री उशिरा पर्यंत याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र शहरातील महिलांनी व नागरिकांनी अशा घटना पासून सावध रहावे असे आवाहन धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी केले आहे.