संजय मालाणी
बीड - राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावातील कटुता कमी करण्यासाठी वंजारी समाजातील काही धुरीणांनी हालचाली सुरु केल्या आहेत. हे होत असतानाच भाजपने मात्र 'मुंडें'ना शह देण्यासाठी मोहरे हलवायला सुरुवात केली असून बीड लोकसभेच्या पटावर धार्मिक क्षेत्रातील एक मोठे नाव उतरवून बीडमध्ये देखील 'सोलापूर पॅटर्न' राबविण्याची खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. अर्थात भाजपच्या या खेळीला मतदार किती 'न्याय' देतील हे मात्र आज सांगता येणार नाही. बीड जिल्हा हा राज्याच्या राजकारणात कायम संवेदनशील राहिलेला आहे. पूर्वी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे व राष्ट्रवादीतील धनंजय मुंडे हे राजकारणात महत्वाचे राहत आलेले आहेत.आतापर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय कटुतेचा खुबीने वापर करीत भाजपने, त्यातही पक्षातील नागपुरी 'चाणक्यांनी ' पंकजा मुंडेंच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र मागच्या काही काळात मुंडे बहिण भावातील राजकीय कटुता कमी व्हावी यासाठी समाजातील काहींनी पुढाकार घेतला आहे. समाजातील उद्योजक, प्रतिष्ठित आदींनी दोघांनाही 'तुम्ही कोणत्याही पक्षात राजकारण करा, पण दोघांमध्ये कटुता आणू नका, समाजाला दोघांचीही गरज आहे.तुमच्यातील 'मुंंडेत्व' अबाधित ठेवा' असे आर्जव केल्याची माहिती आहे. एकीकडे हे होत असताना असे 'मुंडेत्व' जागे झालेच तर भाजपमधील काहींना ती डोकेदुखी ठरणार असल्याने भाजपकडून वेगळाच राजकीय सारीपाट मांडण्याचे घाटत आहे. त्या दिशेने पक्ष हिताचे 'तर्पण' करण्यासाठी 'चाणक्यांनी' काही सोंगट्या हलवायला सुरुवात केली आहे. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना सोबत घेऊन राजकारण करणे भाजपला नवीन नाही. उत्तर भारतात भाजप हा प्रयोग नेहमीच करित आला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सोलापुरात भाजपने हा प्रयोग केला होता, आता बीड लोकसभेसाठी तोच पट मांडण्याचा भाजपचा डाव असल्याची चर्चा आहे. यासाठीच एका गडाच्या महंतांभोवती राजकीय फासे टाकले जात आहेत. 'सागर' बंगल्याचे राजकीय दुत त्या महंतांसोबत 'भारतीय' संस्कृतीच्या गहन चर्चा करताना अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे आता धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीच्या आडून 'मुंडेत्वा'ला शह देण्याची खेळी भाजपचे 'नागपुरी चाणक्य' खेळत असल्याची चर्चा आहे. अर्थात आता कुठे पट मांडला जात आहे, भाजपचे सारेच फासे योग्य पडणार का? महंत त्याला फाशी पडणार का? आणि इतके झाल्यानंतर मतदार भाजपला हवा तसा 'न्याय' करणार का? हे सारे काळच ठरवेल.