Advertisement

हातभट्टी दारू माफियाविरूध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

प्रजापत्र | Wednesday, 18/01/2023
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - हातभट्टी दारू तयार करून जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे अशा स्वरूपाच्या 6 गुन्ह्यांची नोंद असलेल्या बीड तालुक्यातील एका हातभट्टी दारू माफियाविरूध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदरील माफियाला आज पहाटे हर्सुल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत बंडु कठाळु गायकवाड (वय 45 रा.सौदाणा ता.बीड) याच्याविरूध्द हातभट्टी दारू तयार करणे, जवळ बाळगणे आणि त्याची चोरटी विक्री करणे अशा 6 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी 5 गुन्हे न्यायप्रविष्ट असुन 1 गुन्हा पोलीस तपासावर आहे. त्याच्याविरूध्द यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र पोलीस कारवाईला न जुमानता तो पुन्हा जोमाने हातभट्टी दारू तयार करत होता. या प्रकरणी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी त्याच्याविरूध्द एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सदरील प्रस्तावावर काल एमपीडीए कारवाईचे आदेश पारित केले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सतिष वाघ यांनी बंडु गायकवाड याला ताब्यात घेवुन ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्याला आज पहाटे औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पो.नि.सतिष वाघ, पो.नि.संतोष साबळे, सपोनि उबाळे, पोना सुनिल अलगट, अंकुश वरपे, जायभाये व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे यांनी केली.

Advertisement

Advertisement