Advertisement

गोपीनाथांचा आशीर्वाद,पण पंकजांना नाही साथ

प्रजापत्र | Monday, 16/01/2023
बातमी शेअर करा

संजय मालाणी 

बीड - गहिनीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यंमत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद मिळाल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंनी फडणवीसच काय अनेकांना आशीर्वाद दिला. जसे एकेकाळी काँग्रेसचा दगड देखील निवडून यायचा, तसेच काही काळ गोपीनाथ मुंडे म्हणतील तो उमेदवार निवडून यायचा. ती शक्ती गोपीनाथ मुंडेंनी जनतेच्या जिवावर कमावली होती. त्यामुळे आजही भाजपच्या नेत्यांना मराठवाड्यात तरी गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यावेच लागते, तसे घेऊन फडणवीस आशिर्वादाला जागले असे म्हणायला हरकत नाही. मात्र गोपीनाथरावांच्या आशीर्वादाचा उल्लेख करतानाच त्यांच्या कन्या असलेल्या पंकजांची फडणवीसांना आणि फडणवीसांची पंकजांना साथ असल्याचे कुठेच दिसत नाही. या दोन नेत्यांमधील हा राजकीय दुरावा हाच सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

 

महाराष्ट्र भाजपात गोपीनाथ मुंडे हे कायम हेवीवेट नेते होते. महाराष्ट्रात त्यांच्या इच्छेविरोधात जायची कोणाची हिम्मत नसायची. अगदी त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या बीड जिल्ह्यातील एका आमदारांना एकदा नितीन गडकरींना आपल्या कार्यक्रमाला बोलावण्याची इच्छा झाली व ते निमंत्रण घेऊन गडकरींकडे गेले, मात्र तेव्हा गडकरींसारख्या नेत्यानेही 'गोपीनाथरावांची एनओसी आहे का?' असा सवाल त्या आमदारांना विचारला होता. हे आठवण्याचे कारण म्हणजे त्याच गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात मागच्या १५ दिवसात देवेंद्र फडणवीस दोन वेळा आले. दोन्ही वेळा भाषण करताना फडणवीसांनी 'आम्ही गोपीनाथ मुंडेंमुळेच राजकारणात आहोत' असे आवर्जून सांगितले. बीड जिल्ह्यात आल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यावेच लागते ही फडणवीसच काय खुद्द मोदींचीही राजकीय मजबुरी आहेच, पण फडणवीस ज्यावेळी स्वतःला गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद असल्याचे सांगतात, त्यावेळी त्यांच्या कन्या मात्र फडणवीसांच्या स्टेजवर नसतात. ज्या गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात त्यांच्या इच्छेशिवाय कोणी यायचे नाही, त्याच जिल्ह्यात आता त्यांच्या वारसदारांना विचारण्याची आवश्यकता भाजपच्या नेत्यांना वाटत नाही हा राजकारणात झालेला बदल आहे. अर्थात यासाठी भाजपच्या नेत्यांनाच दोष द्यावा असेही काही नाही . गोपीनाथ मुंडे ज्यावेळी राजकारणात होते त्यावेळी त्यांच्यात अनेकांना उभे करण्याची जशी क्षमता होती, तशी ते जागा दाखविण्याची ताकत देखील ठेवून होते. आज त्यांच्या राजकीय वारसदारांचे काय? राज्यातले सोडा, स्वतःच्या जिल्ह्यात त्यांना ग्राउंड टिकविता आले आहे असे म्हणणे धाडसाचे होईल अशी परिस्थिती आहे. भाजपने मागच्या काळात पंकजा मुंडे यांच्या गडात अनेक सुरुंग लावले, अगदी भागवत कराड , रमेश कराड अशी माणसे पंकजच्या गोटातून अलगद बाजूला काढली. रमेश पोकळे सारखा भाजपचा जिल्हाध्यक्ष साहेबांच्या जवळचा असा माणूस दुरावला, ही तर जरा प्रसिद्धी असलेली नावे. इतर कितीतरी कार्यकर्ते आता एकतर घरी स्वस्थ बसले आहेत, किंवा त्यांना आपली सोय पाहावी लागली आहे. अगदी नितीन कोटेचांसारखा व्यक्ती देखील आता पंकजांच्या गोटात राहिली नाही, आणि हे सारे होत असताना पंकजांनी ही माणसे दुरावत असताना काय केले? तर काहीच नाही. 'मला स्वतःला काही नको, आणि माझ्या कार्यकर्त्यांना देखील काही नको' 'माझ्या वडिलांनी पक्षात अनेकांना वाटले, आता काय मी इतरांच्या दारात मागायला जाऊ का?' हा त्यांचा स्वाभिमान. हा त्यांच्यासाठी बरा आणि खरा असेल पण कार्यकर्त्यांचे काय? आज पंकजा मुंडे मी कार्यकर्त्यांसाठी देखील काही मागणार नाही असे म्हणतात, मात्र गोपीनाथ मुंडेंनी गोपाळ शेट्टी, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अशा कितीतरी नेत्यांसाठी संघ परिवाराच्या विरोधात सारी 'प्रतिष्ठा' पणाला लावली होतीच. राज्याचे जाऊद्या, विधानपरिषद निवडणुकीत पोलिसांनी एका शिक्षकाला मारले म्हणून ठाण्यात जाऊन बसलेले गोपीनाथ मुंडे, जिल्हा परिषदेच्या राजकारणात सदस्याचे अपहरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले गोपीनाथ मुंडे यांची तरी आठवण पंकजा मुंडेंनी ठेवायला हवी, असे नेते आणि कार्यकर्तेच ग्राउंडवरची शक्ती असतात, ती शक्ती गोपीनाथ मुंडेंनी सांभाळली होती म्हणून त्यांच्या इच्छेविरुद्ध जायची हिम्मत भाजपामध्ये नव्हती. आता त्याच पंकजा मुंडेंना भाजप सहज दुर्लक्षित करते. किंबहुना पंकजांनी ही परिस्थिती स्वतः ओढवून आणली आहे. जेव्हापासून पंकजा 'मनातल्या मुख्यमंत्री' झाल्या, तेंव्हापासून फडणवीस आणि पंकजांमध्ये राजकीय दुरावा वाढला. त्यानंतरचे जनादेश यात्रेतील 'मानापमान ' नाट्य असेल किंवा फडणवीसांच्या अनेक दौऱ्यांना पंकजांनी मारलेली दांडी, औरंगाबादेतील मोर्च्याच्या वेळी 'लोकलच्या नेत्यांनी काढलेला मोर्चा' अशी पंकजा मुंडेंनी दिलेली प्रतिक्रिया, त्यांना पक्षाच्या आजच्या नेतृत्वापासून जास्तच दूर नेत आहे. भाजपला याची किंमत जेंव्हा चुकवावी लागेल तेव्हा भाजप चुकविलही कदाचित, पण आज तरी गोपीनाथरावांच्या आशीर्वाद म्हणणारे फडणवीस पंकजांना साथ देत नाहीत याची किंमत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांना चुकवावी लागत आहे.

Advertisement

Advertisement