Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - शिंदेंची कोंडी

प्रजापत्र | Thursday, 12/01/2023
बातमी शेअर करा

मोठ्या हौसेने एकनाथ शिंदेंनी  भाजच्या वळचणीला जाण्याचा निर्णय तर घेतला, भाजपनेही आपण फार मोठे मन करीत असल्याचे दाखवीत शिंदेंना मुख्यमंत्रीपद देखील दिले . मात्र आता प्रत्येक वळणावर एकनाथ शिंदेंची गोची करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये अगदी एकेरीवर हमरीतुमरी होते काय आणि भाजपचे लोक देवेंद्र फडणवीसांनाच मनातले मुख्यमंत्री म्हणतात काय , हे सारे प्रकार एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला त्यांची 'जागा ' दाखविणारे आहेत. मात्र हे सारे सहन  करण्यापलीकडे शिंदेंकडे देखील  पर्याय नाहीच . शेवटी स्वाभिमान सत्तेपेक्षा मोठा थोडीच असतो ?

राज्यात शिंदे फडणवीसांचे सरकार अस्तित्वात असले आणि एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री असले तरी सरकारमध्ये चलती आहे ती उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचीच. मुळातच राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळी पक्षाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडले त्यावेळीच सरकारचा रिमोट आपल्याच हातात राहावा यासाठीच भाजपची ही खेळी असल्याचे सुस्पष्ट झाले होतेच. त्यानंतर देखील अनेकदा भाजप  शिंदे गटाला दुय्यम वागणूक देत असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता तर राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये एकेरीवर हमरीतुमरी होत आहे. यापूर्वी अब्दुल सत्तर किंवा दादा भुसे अशा मंत्र्यांचे कान स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे टोचले होते. 'घोषणा करताना आम्हाला सांगून करा ' असे स्पष्टपणे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला होताच.
एकीकडे मंत्रिमंडळाच्या पातळीवर असे असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला उत्सुक आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेले चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा आज बोललेल्या नवनीत कौर , इतरही अनेक नेते वारंवार देवेंदनरा फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत , त्यांच्या नेतृत्वात सरकारने विकास करावा अशी वक्तव्ये जाहीरपणे करीत असतात . एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ज्यावेळी एखादे विधान जाहीरपणे करतो, त्यावेळी ते विधान सहज आलेले नसते, तर त्यामागचा कार्यकारणभाव देखील तितकाच महत्वाचा असतो.
मंत्रिमंडळातील बेदिली असेल, ती माहिती बाहेर येणे असेल किंवा शिंदे गटाच्या मंत्र्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ असेल, आणि कमीअधिक म्हणून भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये असतील, हे सारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला 'जागा दाखविणारे ' आहे. भाजपला शिवसेनेमध्ये फूट पडायची होती, शिवसेनेला धडा शिकवायचा होता, त्यांचा तो हेतू आता सध्या झाला आहे. राहिला प्रश्न सत्ता मिळविण्याचा , तर भाजपला सत्तेसाठी केव्हाही आणि कोठेही 'ऑपरेशन लोटस ' चा अनुभव आहेच. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी कोणाला गळाला लावणे भाजपसाठी अवघड नाही . प्रश्न आहे तो शिंदेंचा . ज्यांनी स्वाभिमानाच्या घोषणा देत शिवसेनेत फूट पडली, ते आता कोडगेपणाने भाजपकडून होणारे शाब्दिक वार झेलत आहेत. 

Advertisement

Advertisement