बीड दि.10 (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील आत्महत्याप्रवन 14 जिल्ह्यात शेतकरी कुटुंबांसाठी सुरु असलेली रेशन योजनाही अडचणीत आली आहे. मागच्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी धान्य मिळणे बंद झाले असतानाच आता केंद्र सरकारने या याजेनेसाठी धान्य द्यायला सपशेल नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या बीड, लातूर, उस्मानाबादसह 14 जिल्ह्यातील एपीएल शेतकर्यांना धान्य देण्यासाठी खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आहे. तसे झाल्यास या 14 जिल्ह्यातील शेतकर्यांना पुन्हा रेशनवर 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ मिळू शकेल.
महाराष्ट्रातील बीड, लातूर, उस्मानाबादसह 14 जिल्ह्यांमधील अन्न सुरक्षा योजनेच्या परिघात न येणार्या मात्र एपीएल रेशनकार्ड असलेल्या शेतकरी कुटुंबांना राज्य शासानाने अन्न सुरक्षेच्या दराने रेशन देऊ केले होते. मात्र मागच्या जुलै महिन्यापासून या योजनेसाठी धान्य मिळणे अवघड झाले आहे. जुलै महिन्यात या योजनेतून अन्न महमंडळाने गहु बंद केला होता. मागच्या दोन महिन्यात या योजनेचा तांदूळही बंद झाला आहे. आता तर आम्ही या योजनेसाठी धान्य देऊ शकत नाही असे केंद्राने राज्य सरकारला स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर आता या 14 जिल्ह्यातील शेतकर्यांना धान्य देण्यसाठी खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. खुल्या बाजारातून धान्य विकत घेवून ते सवलतीच्या दराने एपीएल शेतकरी कुटुंबांना देण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरु केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. स्वत: अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याला पुष्टी दिली आहे.
आ.नमिता मुंदडांनी केली होती मागणी
एपीएल शेतकरी कुटुंबांना धान्य मिळत नसल्याबद्दल आ.नमिता मुंदडा यांनी तक्रार करुन बीड, लातूर, उस्मानाबादसह 14 जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना धान्य द्यावे अशी मागणी केली होती. या मागणीला उत्तर देताना राज्याचे पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी खुल्या बाजारातून धान्य खरेदी करुन शेतकरी कुटुंबांना देण्याचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले आहे.