उस्मानाबाद, दि. 2 - प्रामाणिक व पराक्रमी माणूस हा विचारांच्या सामर्थ्यावर इतिहास घडवितो, हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून व चिकित्सक अभ्यास करून देश घडविण्याचे काम केल्यामुळेच डॉ. आंबेडकरांनी सर्वांनाच आत्मज्ञान, मूल्य व प्रतिष्ठा मिळवून देणारा संविधान ग्रंथ देशाला दिला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. डी. टी. गायकवाड यांनी केले.
उस्मानाबाद येथे स्मृतिशेष रंगनाथ कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकार व ज्येेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणमहर्षी आर. डी. सूळ, रवींद्र शिंदे, एम. आर. कांबळे, अंजली गायकवाड, अश्विनी कांबळे, छाया माळाळे, ऍड. प्रियांका साबळे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, युवराज नळे, सुनील बनसोडे, रवींद्र शिंदे, सोपान खिल्लारे, अॅड. अजित कांबळे, डी. एस. भातलवंडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक समता, स्वातंत्र्य व माणसांच्या मुक्तीचे अनेक लढे देत पुरोहितशाही, स्वर्ग, नरक व जाती व्यवस्था निर्माण करणार्यांच्या छातीवरच लाथ घातली आहे. तर 1946 साली मंत्री असताना रस्ते व पाणी यांचे नियोजन करुन पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगितले होते. तसेच चळवळ उभी करायची असेल तर आपल्याला कृतीशील कर्तव्य करावी लागतील. तर जातीअंताचा लढा उभारण्यासाठी समाज प्रबोधनाची वाट धरावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
योगीराज वाघमारे म्हणाले की, अडाणी लोकांना जितके बाबासाहेब समजले, तितके शिकलेल्यांना समजले नाहीत, असे सांगत ते अशिक्षित समाजाबद्दल अतिशय तळमळीने बोलायचे, असे त्यांनी नमुद केले. तर रंगनाथ कांबळे यांनी अतिशय अडचणीतून समाजकार्य केले. सामान्य कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांना मदत करुन खरे समाज कार्य काय असते व दुसर्यांचे कौतुक कसे करायचे? हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाले, अशा शब्दांत त्यांच्या कार्याची महती सांगितली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वस्तीगृह चालवावीत, असे सांगितले होते. त्याचे पालन कांबळे यांनी केले. तसेच त्यांनी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. त्यामुळे आपले जुने विचार चळवळीशी दुरुस्त करून पुन्हा चळवळीला बळकट करू, असे व्ही. एल. सूर्यवंशी, जे. टी. कांबळे, आर. डी. सूळ यांनी कांबळे यांच्या समाज कार्याच्या विविध आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सांगता संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. विक्रम कांबळे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
कांबळे यांच्या नावाने पुरस्कार
जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांची माहिती संकलित करण्यात यावी. हयात नसलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा इतिहास लिहिण्यात यावा. त्यासाठी इतिहास लेखन व माहिती समिती गठीत करण्यात यावी. चळवळीच्या नोंदी गतीने करून कृतिशील कार्याचा गौरव व्हावा यासाठी रंगनाथ कांबळे यांच्या नावाने पुरस्कार देण्याबाबतचा ठराव यावेळी सर्वानुमते पारित करण्यात आला. या ठरावाचे वाचन उमेश कांबळे यांनी केले. त्यास उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात सर्व ठराव पारित केले.