बीड दि.२८(प्रतिनिधी) मद्यपान संसाराची धुळधाण, व्यसनाची गोडी अन् संसाराची राखरांगोळी, घ्याल तंबाखुची साथ, आयुष्य होईल बरबाद, अशा विविध घोषणा शनिवारी (दि.३१) बीडमध्ये निघणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर रात्री रसिक प्रेक्षकांना व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत सांस्कृतिक स्वर सुमनांजली कार्यक्रमाचा लाभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे घेता येणार आहे अशी माहिती कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने देण्यात आली आहे.
घरातील एका व्यसनी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुःख सहन करावे लागते. लोकांकडून होणाऱ्या कुचेष्टेला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत आपल्या कुटुंबातील कोणीही व्यसनाच्या आधीन जाऊ नये या उदात्त हेतूने शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आ.विनायकराव मेटे यांनी व्यसनमुक्ती साठी लढा उभा करून मोहीम राबवण्याचा चंग बांधला होता. व्यसनाधीनतेमुळे समाजाचे होणारे नुकसान आणि हानी टाळण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती अभियान जिल्ह्यात सुरू केले, आज त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांनी घेतलेला वसा पुढील चालू ठेवण्यासाठी कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी देखील व्यसनमुक्ती जनजागृती महा रॅलीचे व स्वर सुमनांजली या कार्यक्रमांचे आयोजन दिनांक ३१ डिसेंबर रोजी शनिवार रोजी करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथून या जनजागृती फेरीला हिरवी झेंडा दाखवून सुरुवात होईल सुभाष रोड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या मार्गे फेरी सामाजिक न्याय विभागात पोहोचेल. शहरातील विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह तरुण आणि नागरिक या फेरीत सहभागी होणार आहेत.
बातमी शेअर करा