Advertisement

पोकळेंच्या उमेदवारीला मुंडे-महाजनांच्या फोटोची कुमक

प्रजापत्र | Thursday, 19/11/2020
बातमी शेअर करा

बीड : राज्य विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तब्बल 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूकीत अपक्ष म्हणून उतरलेले भाजपचे बंडखोर रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा सोबत घेवून अर्ज भरला होता. आता त्यांच्या सोशल मीडियावरील प्रचाराच्या फोटोंमध्ये मुंडे महाजनांसोबतच दिवंगत वसंत काळे यांचेही फोटो दिसत आहेत. मुंडे, महाजन, काळेंच्या फोटोंची कुमक पोकळेंसाठी महत्वाची ठरणार आहे. 
                        रमेश पोकळे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यासोबतच त्यांचा विविध चळवळींशी अनेक वर्षांचा संबंध आहे. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघांमध्ये रमेश पोकळे यांचे चांगले काम आहे. मात्र असे असतानाही भाजपने या मतदार संघात उमेदवारी देताना रमेश पोकळेंना गृहीत धरले.पोकळे यांचाच या मतदार संघातील उमेदवारीवर दावा असताना पक्षाने ऐनवेळी बोराळकरांना दिलेली उमेदवारी भाजपमधील बहुजन कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. पक्षाची शिस्त म्हणून माजी मंत्री पंकजा मुंडे आज जरी शिरीष बोराळकर यांच्यासाठी बोलत असल्या तरी पंकजांची टिम मात्र रमेश पोकळेंच्याच सोबत आहे. अगदी रमेश पोकळेंच्या सोशल मीडियातील प्रचारात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, दिवंगत प्रमोद महाजन आणि वसंत काळे यांचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. मराठवाड्यात या तीनही नेत्यांवर जीव टाकणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. त्यामुळेच मुंडे, महाजन काळेंच्या फोटोंचे आशिर्वाद रमेश पोकळेंचे बळ वाढविणारे ठरणार आहेत.

 

Advertisement

Advertisement