Advertisement

माजी खा. जयसिंग गायकवाडांची भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीत जाणार

प्रजापत्र | Tuesday, 17/11/2020
बातमी शेअर करा

बीडः बीडचे माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. २०१० मध्ये जयसिंग गायकवाड हे भाजपात परतले होते.
मुळचे भाजप कार्यकर्ते असलेले जयसिंग गायकवाड यांनी २ वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. युती सरकारच्या काळात ते राज्यात तर रालोआ सरकारच्या काळात केंद्रात राज्यमंत्री होते. मात्र २००४ मध्ये त्यांनी मुंडे महाजनांच्या राजकारणाला वैतागून भाजप सोडला होता. तसेच राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणून आले होते. मात्र २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि सेनेत गेले. २०१० मध्ये नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या आवाहनानुसार गायकवाड भाजपात परत आले. पक्षाने त्यांच्यावर किसान मोर्चाची जबाबदारी दिली. तसेच २०१९ मध्ये त्यांना औरंगाबाद लोकसभा लढविण्याची देखील तयारी करायला सांगितले होते. मात्र युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेकडे गेल्याने त्यांची संधी हुकली. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी आपला विचार व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र पक्षाने शिरीश बोराळकर यांना उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याने त्यांनी मंगळवारी भाजपचा राजीनामा दिला.
दरम्यान विधानपरिषदेसाठी ते सतिश चव्हाण यांना पाठबळ देणार असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Advertisement

Advertisement