Advertisement

ग्रामपंचायतीसाठी उमेदवार शोधताना पॅनल प्रमुखांची उडतेय तारांबळ

प्रजापत्र | Sunday, 27/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील सातशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे . मात्र यावेळी सरपंचांची निवड थेट जनतेतून होत असल्याने ग्रामपंचायत अस्या व्हायला फारसे लोक इच्छुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्याच पॅनलमधून उमेदवारी देण्यासाठी त्याची मनधरणी करण्याची वेळ पॅनल प्रमुखांवर येत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तयार झालेला उमेदवार रात्रीतून निर्णय फिरवीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये सध्या पंतप्रमुखांची तारांबळ उडत आहे.

 

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येकवेळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावामध्ये चुरस असायची. ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लढविण्यासाठी लोकांमध्ये उत्साह असायचा. यावेळी मात्र सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सदस्य निवडीसाठी लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्याचे चित्र आहे.
सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने असे सरपंच पुढची पाच वर्षे एकहाती कारभार हाकणार हे स्पष्ट आहे. या सरपंचांना दीर्घकाळ अविश्वासापासून देखील संरक्षण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश सदस्य केवळ 'सह्याजीराव ' ठरणार आहेत. मग असल्या नामधारी पदासाठी खर्च करायचा कशाला आणि गावात  अनेकांचा रोष घ्यायचा कशाला अशी मानसिकता वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांमधून सदस्य पदासाठी उमेदवार शोधताना सरपंचपदाच्या उमेदवारांची किंवा पॅनल प्रमुखांची तारांबळ उडत आहे.

 

 

 

निवडणूक होणार खर्चिक
यावेळी बीड जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणावर ऊसतोड कामगार स्थलांतरित झालेला आहे. आता मतदानासाठी या स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजुरांना गावात आणण्याचे काम मोठे जिकरीचे ठरणार आहे. हे मतदान गावात आणायचे म्हटले तर त्यांचा प्रवास खर्च, इतर सोय आणि त्यासोबतच अनेकदा बुडणारी मजुरी देखील द्यावी लागते असा अनुभव आहे. त्यामुळे आता अनेक गावांमध्ये सरपंच पदाच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक अधिक खर्चिक होणार आहे.

 

 

 

आतापासूनच खर्चापाण्याची 'डिजिटल ' व्यवस्था
ग्रामपंचायत निवडणुकीची थेट प्रक्रिया अद्याप सुरु वह्यांची आहे. मात्र अनेक ठिकाणी जे लोक बाहेर आहेत, आणि ज्यांना इच्छुकांनी 'संपर्क ' साधलेला आहे, त्यांनी अनेक ठिकाणी 'आम्ही येणारच आहोत , पण तोवर खर्चापाण्याची काही व्यवस्था करा ' अशी मागणी करायला सुरुवात केल्याची माहिती आहे. पूर्वी आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल मार्ग उपलब्ध नव्हते, आता मात्र थेट फोनपे किंवा गुगलपे करा अशी फर्माईश अनेकजण करीत असल्याची चर्चा जोरात आहे.
 

Advertisement

Advertisement