Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - राजकारणासाठी बहुजन चेतनांचा वापर

प्रजापत्र | Monday, 21/11/2022
बातमी शेअर करा

 

राज्यात राहुल गांधींनी सावरकरांवरील टीका आणि त्याला उत्तर देताना सावरकरवाद्यांची होत असलेली अडचण यावरचे लक्ष बाजूला करण्यासाठीच वाचाळवीर असलेल्या कोश्यारींनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांवरूनच नवीन वाद निर्माण केले आहेत. मागच्या काही काळात सातत्याने स्वतःच्या राजकारणासाठी महापुरुषांना वेठीस धरण्याचे अश्लाघ्य प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. आपल्या प्रेरणास्थानांना , त्यांच्या विचारांना , मुद्द्यांच्या आधारे उत्तर देता येत नसेल तर बहुजन प्रेरणांवर चिखलफेक करायची, किंवा बहुजनप्रेरणांच्या संदर्भाने काहीतरी बरळायचे आणि मुख्य मुद्द्यावरचे लक्ष विचलित करायचे या विकृत सापळ्यात सामान्यांनी किती दिवस अडकायचे हे आता ठरवावे लागेल.

 

 

महाराष्ट्राला वैचारिक वाद नवीन नाहीत , या वैचारिक वादांमधूनच महाराष्ट्राच्या समाजकारणाला दिशा देण्याचे काम झालेले आहे. अनेकदा देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्रातील वैचारिक वादांनी झाले हा इतिहास आहे. मात्र त्या प्रत्येकवेळी त्या वैचारिक वादांना नैतिकतेची किनार होती, एक वैचारिक अधिष्ठान होते, त्यामुळेच त्या घुसळणीमधून काही तरी निघू शकले. महाराष्ट्रातच ब्राहमण - ब्राह्मणेत्तर चळवळीवरून देखील मोठ्याप्रमाणावर मंथन झाले, मात्र त्यावेळी महापुरुषांना वेठीस धरण्याची परंपरा नव्हती. आता मात्र मागच्या काही काळात राजकीय स्वार्थासाठी नवे नवे वाद निर्माण केले जात आहेत. संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून महापुरुषांच्या संदर्भाने अश्लाघ्य वक्तव्ये केली जातात.

 

आणि केवळ ती व्यक्ती संवैधानिक पदावर आहे म्हणून महाराष्ट्राला ते निमूटपणे सहन करावे लागते हेच मागच्या काही काळात अनुभवायला आले आहे. राजभवनातून राजकारण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य केवळ आणि केवळ अनाठायी म्हणावे असेच होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत, त्यांचे व्यक्तिमत्व हाच एक विचार आहे, आणि अस्मिता किंवा विचार कधीच जुना होत नसतो, याची जाणीव कोश्यारींना नसेल असे समजणे म्हणजे त्यांच्या राजकीय मुत्सद्देपणावर अन्याय केल्या सारखे होईल. मात्र कोश्यारी असे सातत्याने जाणीवपूर्वक बरळत आहेत . आजच नव्हे , तर यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या ज्या बहुजन चेतना आहेत, त्यांचा मानभंग करण्याची एकही संधी कोश्यारी सोडीत नाहीत हेच मागच्या काळातील घटनाक्रम सांगतो. कधी सावित्रीमाईंचा अवमान कर, कधी महात्मा फुलेंचा अवमान कर, तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने अवमानकारक बोल , असले उद्योग कोश्यारी जाणीवपूर्वक करीत आहेत. या महाराष्ट्राने इतिहासात ब्राह्मण -ब्राह्माणेतर संवघर्ष अनुभवलेला आहे, त्याच महाराष्ट्रात आता काही दशकानंतर पुन्हा एकदा बहुजन चेतनांना हिणवण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करीत आहेत. कोश्यारींची विचारधारा कोणती आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांच्या डोक्यावरची काळी टोपी, ते कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात हे सांगायला पुरेशी आहे. या विचारधारेने कायम महाराष्ट्रातील बहुजन विचारधारेला दुय्यम वागणूक दिलेली आहे.

 

म्हणूनच बहुजन समाजात ज्या विचारांना प्रेरणादायी म्हणले जाते, किंवा बहुजन समजावर ज्यांच्या विचारांचा प्रभाव असतो, अशा महापुरुषांचा मानभंग करण्याचे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. असे प्रयत्न करायचे, ते समाजात किती खपतात ते पाहायचे आणि नंतर हळूहळू जणू काही तेच वैश्विक सत्य आहे अशा धाटणीने बोलत राहायचे असली सडकी मानसिकता काही विशिष्ट वर्ग महाराष्ट्रात सातत्याने राबवित आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा छत्रपती घराणे, महाराष्ट्रातील काही शक्तींनी कायम त्या घराण्याबद्दल, त्यांच्या व्यापक विचारांबद्दल असूयाच बाळगली आहे, आज त्याच शक्तींचे बोलके पोपट म्हणून कोश्यारी वावरत आहेत. याच महाराष्ट्रात वेदोक्त प्रकरण ज्यांनी घडविले होते, त्यांचेच संकुचित मानसिकतेचे वारसदार आज कोश्यारींच्या तोंडातून बोलत आहेत.

 

 

सावरकरांवरील टीकेनंतर राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्राबाहेर गेली देखील, मात्र सावरकरवाद्यांना त्या टीकेला समर्पक उत्तर देता येत नाही आणि आता ती चर्चा थांबत नाही, त्यामुळे सावरकरांचे होणारे प्रतिमाभंजन रोखायचे असेल तर चर्चेचा रोख बदलला पाहिजे, लोकांना काहीतरी नवा विषय दिला पाहिजे याच हेतूने काही 'चाणक्यांनी ' कोश्यारींच्या तोंडून नाव वाद निर्माण केला आहे. या माणसाला महाराष्ट्राच्या अस्मितांशी काहीच देणे घेणे नाही , त्याला महाराष्ट्राच्या माथी राज्यपाल म्हणून मारण्यात आले. उतारवयात झालेल्या पुनर्वसनामुळे ज्यांनी पुनर्वसन केले त्यांचे उपकार फेडण्यासाठीच कोश्यारी काहीही बरळायला तयार असतात , आणि महाराष्ट्राला हे निमूटपणे सहन करावे लागते हे खरेतर दुर्दैव आहे. आता जनक्षोभ पाहता कदाचित कोश्यारींना महाराष्ट्रातून हटविले जाईलही , तितकी संवेदनशीलता, त्याहीपेक्षा राजकीय परिणामाची जाणीव भाजप दाखवीळि कदाचित, पण या साऱ्या प्रकारात बहुजन चेतनांचा, बहुजन प्रेरणांचा वापर होतोय, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

Advertisement