बीड दि.१३ (प्रतिनिधी) - तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रासाठी बीएसएस मोटार या कंपनीची इलेक्ट्रीक बाईक आणि स्कुटरची डिलरशीप देतो तसेच तुम्हाला पाच इलेक्ट्रीक मोटारसायकल पाठवून देतो, असे सांगून एका भामट्याने तब्बल पावणे चार लाखांना गंडवल्याची घटना घडली असून या प्रकरणी काल बीड ग्रामीण ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव सुभाषराव कुडके (वय 38 वर्षे, व्यवसाय शेती, रा. अव्वलपूर ता. जि. बीड) या शेतकर्याला ब्रिश्वदीप सरकार (रा. कोलकाता राज्य पश्चिम बंगल) याने फोन करून तुम्हाला बीएसएस मोटार या कंपनीची इलेक्ट्रीक बाईक आणि स्कुटरची संपुर्ण महाराष्ट्रात डिलरशीप देतो, तसेच तुम्हाला पाच इलेक्ट्रीक मोटारसायकल लागलीच पाठवून देतो, असे म्हणून पैशाची मागणी केली. त्यावेळी महादेव कुडके यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून फोन पे वरून पैसे पाठवले. दि. 28 नोव्हेंबर 2021 पासून ते दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांना तब्बल 3 लाख 70 हजार रुपये पाठवूनही डिलरशीप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महादेव कुडके यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत ब्रिश्वदीप सरकार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.