बीड दि.११ (प्रतिनिधी) - आरोग्याचा विमा उतरवूनही त्याची पुर्ण रक्कम विमा कंपनीने दिली नसल्याने याबाबत ग्राहक तक्रार आयोगाकडे धाव घेण्यात आली होती. आयोगाने सर्व रक्कम देण्याचे आदेश देत तक्रारीचा झालेला खर्च सुद्धा द्यावा, असे आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत.
गणेश सर्जेराव काळे यांनी इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे कोरोना कवच पॉलिसी स्वत: व कुटुंबासाठी घेतली होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सोलापूर येथील चंदन न्युरो सर्जिकल हॉस्पिटलमध्ये दाखवले होते. वैद्यकीय चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे संबंधित डॉक्टरांनी म्हटले होते. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार घेण्यात आले. त्यांचा एकूण खर्च 1 लाख 23 हजार 127 रुपये इतका झाला होता. काळे यांनी वैद्यकीय व मेडिसीन खर्च मिळवण्याकरिता विमा कंपनीकडे अर्ज केला असता सदरील विमा कंपनीने 67 हजरा 800 एवढीच रक्कम मंजूर केली होती. उर्वरित रक्कम तक्रारदाराने स्वत: भरणा केली होती. त्यामुळे तक्रारदाराने वकिलामार्फत कंपनीस नोटीस पाठविली होती. परंतु विमा कंपनीने तक्रारदारास रक्कम दिली नाही. त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण विभागाकडे तक्रार दाखल केली. सदरील तक्रारदाराच्या वतीने अॅड. उमेश नामदेवराव रकटे यांचा युक्तीवाद व दाखल कागदपत्र यावरून ग्राहक तक्रार निवारण बीड यांनी तक्रारदारास 30 दिवसांच्या आत वैद्यकीय खर्चापोटी 55 हजार 327 इतकी रक्कम वर नमूद विमा कंपनीने द्यावी, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी 5 हजार रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून हजार रुपये द्यावेत, असा आदेश देण्यात आला आहे. तक्रारदारासतर्फे अॅड. उमेश रकटे यांनी काम पाहिले त्यांना अॅड. डी.जी. भगत यांनी सहकार्य केले.