बीड - राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसह राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज बुधवारी (दि.०९) जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.
आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, स्थानिक तहसीलदार निवडणुकांची नोटीस १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करतील. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ डिसेंबर रोजी प्राप्त अर्जांची छाननी होईल. ७ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तर याच दिवशी चिन्हे वाटप करण्यात येऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान होईल आणि २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.
बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींची होणार निवडणूक
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात बीड तालुक्यातील सर्वाधिक १३२ तर शिरूर का. तालुक्यात सर्वात कमी म्हणजे २४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लवकरच जि.प. आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकाना विशेष महत्व आले आहे.