बीड दि. ८ (प्रतिनिधी)-राज्यात मराठवाडा विभागात शेतकरी आत्म्हत्यान्हस प्रमाण सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा निश्चित अंदाज बांधता यावा यासाठी संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना सदर अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही मराठवाड्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. एकट्या बीड जिल्ह्यात १० महिन्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा २३० च्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे निश्चित भान यावे यासाठी शेतकरी कुटुंबाचा सर्व्हे करण्याचा निर्णय औरंगाबाद विभागात घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्तालयातून तसे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तलाठी, ग्रामसेवक ,अंगणवाडी कार्यकर्ती आणि शक्य झाल्यास शिक्षक यांच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आयुक्तालयाने प्रश्नावली तयार करून पाठविली आहे. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्यावरील कर्ज , शासकीय योजनांचा त्यांना मिळालेला लाभ आदींबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. २५ नोव्हेम्बरपर्यंत हे सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
सर्व्हेक्षणातील महत्वाचे प्रश्न
या सर्व्हेमध्ये शेतकऱ्यांकडची जमीन , त्यांच्याकडे कर्ज आहे का ? असल्यास त्याचा मालमत्तेवर बोजा आहे का ? घर स्वतःचे आहे का ? कोणत्या शासकीय योपजणेतून घर मिळाले आहे का ? त्या कुटुंबाला आजपर्यंत कोणत्या शासकीय योजनांचा लाभ झाला आहे ? सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य मिळते का ? आरोग्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळतो का ? कुटुंबात कोणी आत्महत्या केली आहे का ? आदी प्रश्नाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेतली जाणार आहे.