Advertisement

गुलाबी थंडीत धावले हजारो धावपटू

प्रजापत्र | Sunday, 06/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तिरूमला बालाघाट हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला बीडसह राज्यभरातील धावपटूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.रविवारी (दि.६) सकाळी ६ वाजता गुलाबी थंडीत हजारो धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावले. विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, सीईओ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन धावले. बीडसारख्या ठिकाणी एवढ्या भव्य स्वरूपात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून ती यशस्वी केल्याने तिनही वरिष्ठ अधिकार्‍यांनी तिरूमला ऑईल व योगा प्रतिष्ठानचे कौतुक केले.  

         बीड जिल्ह्याच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहुन ठेवावी अशी ऐतिहासीक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (दि.६) तिरुमला ऑईल बाय द कुटे ग्रुप व योगा प्रतिष्ठाण बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. त्याला कारणही तसेच होते. मॅरेथॉन, ट्रायथलॉन, आयर्नमॅन, सायकलींग सारख्या साहसी क्रिडा स्पर्धा गाजवणार्‍या गुणवंताची खान बीड जिल्हा आहे. प्रत्येक खेळातील गुणवंत येथे आहेत तर मग साहसी क्रिडा स्पर्धा का होत नाहीत? असा प्रश्‍न उपस्थित करत योगा प्रतिष्ठाणने बीडमध्ये राज्यस्तरीय तिरूमला बालाघाट हाप हिल मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. खरेतर बीड सारख्या ठिकाणी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे ही संकल्पनाच नाविण्यपुर्ण होती. परंतू योगा प्रतिष्ठाणचे प्रशांत माने व त्यांच्या सहकार्‍यांनी तिन महिने अथक परिश्रम घेतले. बीडमधील राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा मुंबई- पुण्यातील स्पर्धांच्या तोडीची झाली पाहीजे असे तगडे नियोजन त्यांनी केले. याला तिरूमला ऑईल व कुटे ग्रुप तसेच विविध संस्थांनी प्रायोजक बनत साथ दिली. दरम्यान बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण परिसरातील बालाघाटाचा पायथा ते माथा अशी तिरूमला बालाघाट हाफ हिल मॅरॅथॉन स्पर्धा रविवारी (दि.6) हजारो धावपटूंच्या प्रचंड उत्साहात यशस्वीपणे पार पडली. गुलाबी थंडीत बीडसह राज्यभरातून आलेले हजारो धावपटू मॅरेथॉनमध्ये धावले. या स्पर्धेत पाच किलोमिटर, दहा किलोमिटर, एकविस किलोमिटर असे तिन टास्क ठेवण्यात आले होते. यात पाच किलोमिटर मॅरेथॉनमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडीत, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, वसुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी विक्रम सारुक धावले अन् त्यांनी स्पर्धा पुर्ण केली. विशेष म्हणजे या पहिल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 200 हुन अधिक महिला व मुली सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या धावपटूंना रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह आणि पदक देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तिरूमला ऑईल कुटे ग्रुप, योगा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले. यावेळी चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पाणी बॉटल आणि एनर्जी ड्रींकची सोय करण्यात आली होती. स्पर्धेत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, अधिकारी, व्यापारी, उद्योजन अशा समाजाच्या सर्व स्तरातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement