बीड दि. २ (प्रतिनिधी ) : राज्याचे सहकार मंत्रीच पालक मंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात सहकारामधील धुसफूस चर्चेचा विषय ठरत आहे. येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळात अवघ्या १० दिवसातच बदल करण्यात आले आहेत. आता प्रशासक मंडळाची जबाबदारी अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांच्याऐवजी बीडचे जिल्हा उपनिबंधक स्मृत जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल ११ जागा रिक्त राहिल्याने दोन वर्षांपूर्वी या बँकेवर अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमण्यात आलेल्या या प्रशासक मंडळाऐवजी अशासकीय सदस्यांचे मंडळ नेमण्याची इच्छा भाजपच्या गोटातून होती, तशा हालचाली देखील सुरु झाल्या होत्या. मात्र भाजपच्या या हालचालींना सरकारने खो देत जुन्या प्रशासक मंडळातील अशासकीय सदस्य वगळून अप्पर आयुक्त अविनाश पाठक , आणि उपनिबंधक अशोक कदम यांच्या प्रशासक मंडळाला १० दिवसांपूर्वीच मुदतवाढ दिली होती. मात्र राज्याचे सहकार मंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या जिल्हा मध्यावतरती बँकेतील प्रशासक मंडळाचे हे आदेश अवघ्या १० दिवसात बदलण्यात आले आहेत.आता राज्य सरकारनमें जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाची पुनर्र्चना केली असून जिल्हाउपनिबंधक स्मृत जाधव आणि जिल्हा विशेष लेख परीक्षक बी. यु. भोसले यांचे प्रशासक मंडळ बँकेवर नेमले आहे.