Advertisement

बीड आणि लातूरमधील आठ नगरपंचायतींवर येणार प्रशासक

प्रजापत्र | Thursday, 12/11/2020
बातमी शेअर करा

बीड दि.11 (प्रतिनिधी) : नोव्हेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या नगरपंचायतींवर अखेर प्रशासक नेमण्यात येणार आहे. विद्यमान पदाधिकार्‍यांना मुदतवाढ देण्याची मागणी होत असली तरी राज्यसरकारने नगरपंचायतींना मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्यचे सांगत नोव्हेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या नगरपंचायतींवर उपविभागीय अधिकार्‍यांना प्रशासक म्हणून नेमावे असे आदेश काढले आहे. यामुळे मराठवाड्यातील 14 तर बीड आणि लातूर जिल्ह्यातील सुमारे आठ नगरपंचायतींवर 26 नोव्हेंबरपासून प्रशासक येणार आहे. राज्यातील सुमारे 64 नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये संपत आहे. अद्याप या नगरपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. कोरोना परिस्थितीमुळे निवडणुक आयोगाने या नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नसल्याने या नगरपंचायतींच्या विद्यमान पदाधिकार्‍यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली होती. विशेष म्हणजे याच मागणीसाठी काही नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र नगरपंचायतीची मुदत पाचवर्ष असून त्यांना मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्याचे सांगत राज्यशासनाने 26 नोव्हेंबर रोजी मुदत संपत असलेल्या मराठवाड्यातील 14 नगरपंचायतींवर उपविभागीय अधिकार्‍यांना प्रशासक नेमावे असे आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील चार आणि लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींवर या महिनाअखेर प्रशासक आलेला असेल.

 

केज मध्ये प्रशासकाची मुदत वाढवली 
केज नगरपंचायतीवर यापूर्वीच अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकार्‍यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीला आता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
लातूर जिल्हा - जळकोट, चाकूर, देवणी,शिरुर अनंतपाळ.

 

या नगरपंचायतींवर असणार प्रशासक
बीड जिल्हा - आष्टी, पाटोदा, शिरुर, वडवणी.

 

Advertisement

Advertisement