परळी-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या संदर्भातील खबरदारी म्हणून त्यांच्या 'नाथ प्रतिष्ठान' व मुंबई येथील सुप्रसिद्ध 'वन रुपी क्लिनिक'च्या मार्फत परळी मतदारसंघातील नागरिकांची मोफत थर्मल टेस्टिंग करण्यास आज सुरुवात करण्यात आली.
आज दिवसभरात परळी शहरातील जवळपास १० हजार नागरिकांचे टेस्टिंग करण्यात आले असून सुरुवातीला ना. धनंजय मुंडे यांनी स्वतःची, कुटुंबियांची तसेच त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करून घेतली.
सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यात वरळी नंतर थेट परळी मतदारसंघात कोरोनाच्या संदर्भात खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून 'वन रुपी क्लिनिक'च्या मार्फत ही तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे.
आज मुंडे यांच्या निवासस्थानी तपासणी करून शहरातील पद्मावती भागात तब्बल १० हजार नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली. अशा स्वरूपाची तपासणी करण्यासाठी वन रुपी क्लिनिक चे संचालक डॉ. राहुल घुले यांच्या नेतृत्वात दहा डॉक्टर्सची टीम प्रथमच मुंबई बाहेर वरळी ते थेट परळी आली आहे.
आज पहिल्या दिवशी १० हजार नागरिकांची यशस्वी तपासणी झाली असून येत्या ८ दिवसात एक लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर कोरोनाचा संघर्ष पूर्णपणे थांबेपर्यंत दोन डॉक्टर्स कायम परळीतच राहतील असे डॉ. घुले म्हणाले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अय्युबखान पठाण, फेरोज खान, शंकर आडेपवार, विजय भोयटे, अनंत इंगळे, राम पेंटवार, कैलास तांदळे यांसह पदाधिकारी वन रुपी च्या टीमसह नागरिकांशी समन्वयन करत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment