Advertisement

सराफ व्यापाऱ्याला लुटले

प्रजापत्र | Saturday, 08/10/2022
बातमी शेअर करा

बीड : दुकान बंद करुन गावाकडे परत जाताना पाळत ठेवून दबा धरुन बसलेल्या लुटारुंनी सराफ व्यापारी जवळ येताच बेछूट दगडफेक केली. दगड लागून व्यापारी पडताच सोने-चांदी व रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यामध्ये तब्बल ९ लाखांचा ऐवज होता असे सांगितले जात आहे. याप्रकरणी सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात लुटारुंवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

सचिन उद्धव टाक रा. खोकरमोहा ( ता.शिरुर का. ) यांचे बीड शहरात सराफा दुकान आहे. अनेक वर्षांपासून ते सोने-चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय करतात. दुकान बीड येथे असले तरी रहाण्यासाठी खोकरमोहा येथेच आहेत. दररोज ते येणं जाणं करतात. हीच संधी चोरट्यांनी साधली. ते कधी येतात कधी जातात याचा अभ्यास केला. शुक्रवारी ( दि. ७ ) सचिन टाक यांनी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद केले. दुकानातील सोन्या चांदीचे दागिने व‌ रोख रक्कम एका पिशवीत भरून नेहमी प्रमाणे गावाकडे निघाले. दरम्यान शहराच्या बाहेर काही अंतरावर जाताच कृषी महाविद्यालय जवळ काहीजण टाक यांच्या येण्याची वाट पहात दबा धरून बसले होते. सरफा व्यापारी टाक जवळ येताच अचानक दगडफेक सुरू झाली. दगडफेकीमुळे घाबरून टाक यांनी दुचाकी थांबवली तोपर्यंत एक दगड डोक्याला लागला व ते खाली कोसळले. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दागिने व रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन धुम ठोकली. हे सर्व काही अचानक घडल्याने टाक घाबरून गेले होते. काहींनी मदत करत धीर दिला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहेत. आष्टी तालुक्यातील सराफा दाम्पत्याला मारहाण करुन लुटल्याची घटना ताजी असून पुन्हा बीड जवळ ही घटना घडल्याने ग्रामीण भागातून येऊन शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा लवकर तपास लावण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

Advertisement