Advertisement

धारुरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात

प्रजापत्र | Monday, 03/10/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) - धारुरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात होवून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.३ सोमवार रोजी दुपारी घडली. अपघातातील जखमीना माजलगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. या अपघातात स्विफ्ट डिझायर गाडीचा चक्काचूर झाला आहे.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर तालुक्यातील थेटेगव्हाण या गावाजवळ अरुंद रस्त्यामुळे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बस , ट्रक व स्विफ्ट डिझायर या तीन वाहनांचा अपघात झाला. माजलगावहून धारुरकडे येत असलेल्या मालवाहू ट्रकने (क्र. एमएच २१ डिएच ५१०५) धारुरहून माजलगावकडे जात असलेल्या पंढरपूर परतूर या एसटी बसच्या पाठिमागच्या बाजूस धक्का दिला. यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे बसच्या मागुन माजलगावकडे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर या चारचाकीला सदर ट्रकने समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातानंतर  ट्रक बाजुच्या खड्ड्यात पलटी झाली.

 

 

अपघातात बसच्या पाठीमागील बाजूचे नुकसान झाले असून स्विफ्ट डिझायर  गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कार मधील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. यात सुमित तात्याराव शेंडगे, ज्ञानेश्वर आशोक दिघने, विजय लिंबाजी धुमाळ, रत्नदीप भिमराव टाकणखार सर्व रा. माजलगाव यांचा समावेश आहे. जखमीनां तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार असून पोलिस बीट अमंलदार डि.एस. पुरी यांनी घटनास्थळी भेट दिली. परतूर आगाराच्या बस चालक संजीवन तुकाराम धुमाळे व वाहक सुधाकर नागुराव भरांडे यांनी धारुर पोलिसांशी संपर्क केला असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक  व्हि. एस. आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली धारुर पोलिस करत आहेत.
 

Advertisement

Advertisement