दोन तांड्यावरील धाडीत लाखाचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई दि.८ (वार्ताहर)-दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभाग कामाला लागले असल्याचे चित्र असून परळी तालुक्यात हिंदनगर आणि धारावती तांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी मद्य निर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच त्या ठिकाणी धाड टाकून १ लाख १२ हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड यांनी ही माहिती दिली.
राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर,परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात.त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.सध्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक निमित्ताने आदर्श आचारसंहिता सुरू आहे.या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत परळी तालुक्यात हिंदनगर येथील दोन हॉटेलवर धाड टाकली.तिथे दोन आरोपी आढळून आले.तसेच धारावती तांडा व परिसरात गस्तीवर असताना या दोन ठिकाणी कारवाई करीत एकूण सहा गुन्हे नोंदवले.या धाडीत ४.८६ ब.लिटर विदेशी मद्य,४८०० लिटर रसायन,२०० लिटरचे २७ बॅरल व ६ टोपली असा एकूण १ लाख १२ हजार ३५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड, जवान बी.के.पाटील, वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.
बातमी शेअर करा