Advertisement

नेकनूरचा आठवडी बाजार बनला दुचाकी चोरांचा अड्डा

प्रजापत्र | Sunday, 18/09/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)-तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून परिचित असलेल्या नेकनूरमधून मागच्या महिनाभरात १२-१५ दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.प्रत्येक रविवारी आठवडी बाजरातून २ ते ३ गाड्या चोरीला जात असताना नेकनूरच्या स्थानिक पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे.मागील काही दिवसांपासून चोरटे भरदिवसा आठवडी बाजारातून मोटारसायकल लंपास करत असल्याने याकडे स्वतःआता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चोरटयांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

 

 

        सुदाम चिंचकर (रा.कळसंबर) यांची स्प्लेंडर दुचाकी आठवडी बाजारासाठी आले असताना जिल्हा परिषद शाळेच्या मैदानातून चोरीला गेल्याची घटना रविवारी (दि.१८) समोर आली आहे.या आठवडी बाजारातून मोबाईल,गाड्या,सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढले असून या चोरट्यांना स्थानिक पोलीसच अभय देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मुस्तफा व त्यांच्या टीमला मागच्या महिनाभरापासून दुचाकी चोरीच्या घटनेतील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात यश न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.   

 

 

गाड्या घरी लावून आठवडी बाजराला जा पायी 
मागच्या महिनाभरापासून नेकनूरच्या आठवडी बाजारात पोलिसांच्या नाकावर टिच्चून होत असलेल्या दुचाकी,मोबाईलच्या चोऱ्या अद्यापही थांबत नसल्याने आता नागरिकांनीच बाजाराला जाताना आपल्या गाड्या घरी लावून पायी जाणे सोईचे ठरेल.कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चोऱ्यांमध्ये अद्याप एकही आरोपी अटक होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

 

आधी चौकशी करू नंतर गुन्हा नोंदवू 
मोबाईल, दुचाकी चोरीला गेल्यानंतर तक्रारदार पोलीस ठाण्यात जाताच नेकनूर पोलीस अगोदर चौकशी करतो आणि नंतर चोरीची तक्रार घेतो असे सांगतात.अगदी आज सकाळी सुदाम चिंचकर यांची गाडी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी आधी आपण चौकशी करू याआणि नंतर गुन्हा नोंदवू असे म्हणत वेळ मारून नेत आहेत.दरम्यान गाडी अथवा इतर वस्तूंची चोरी झाली तर पोलीस अगोदर चौकशी करू असे उत्तर देतात मात्र ते चौकशी कोणाकडे करतात हे अद्याप तरी न उलगडलेले कोडे आहे.  

 

 

पोलिसांची प्रतिमा होतेय मलीन 
मागील काही दिवसांपासून आठवडी बाजारातील वाढलेल्या चोरीच्या घटनांमध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक न करण्यात आल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत चालला आहे.सध्या बाजारात खरेदीसाठी जायचं तर गाडी घरीच लावावी अशी परिस्थिती आजघडीला निर्माण झाली आहे.लवकरात-लवकर वरिष्ठ पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारायला हवी. 
हनुमंत तांगडे पाटील 
(प्रदेशाध्यक्ष-विश्व मराठा संघ महा. राज्य)

 

Advertisement

Advertisement