Advertisement

पाण्यात बुडून तिघांचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 07/11/2020
बातमी शेअर करा

आपेगावमधील दोघे तर राक्षसभुवनमधील एकाचा समावेश 

अंबाजोगाई/ गेवराई - मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे घडली.तर गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय मुलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना समोर आली असून शनिवारी जिल्ह्यातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.  
            अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५, दोघेही रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) व अविनाश जगदिश नाटकर (वय-१८) असे मृत तिघांचे नावे आहेत.अनिकेत आणि रोहन हे दोघे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गावाजवळील धानोरा शिवारातील एका पाण्याच्या डोहाकडे गेले होते. मासे पकडत असताना पाय घसरल्याने दोघेही पाण्यात पडले. हे पाहून अनिकतेच्या भावाने धावत येऊन ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.परंतु, ग्रामस्थ डोहाजवळ पोहोचेंपर्यंत त्या दोघांचाही मृत्यु झाला होता. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी आपेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले. दरम्यान, दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे आपेगाववर शोककळा पसरली आहे.
तसेच राक्षसभुवन येथील अविनाश जगदिश नाटकर हा औरंगाबाद येथे १२ वीचे शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद झाल्याने तो गावी आला होता. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास तो मित्रासोबत गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. पात्रात जास्त पाणी असल्याने पोहत असताना अचानक तो पाण्यात बुडाला. बराच वेळ झाल्यानंतरही अविनाश वर आला नसल्याचे मित्राच्या लक्षात आले. त्याने लागलीच याची माहिती तेथील नागरिकांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र, तब्बल सात तासानंतर दुपारी १.३० वाजता त्याचा मृतदेह आढळून आला.

Advertisement

Advertisement