जिल्ह्यात साडे पंधरा हजार रुग्णांना झाली होती सारीची बाधा
बीड दि.6 (प्रतिनिधी)-आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेत बीड जिल्ह्यात कोरोनापेक्षा सारी’चे रुग्ण अधिक असल्याचे समोर आले आहे. कोव्हिड,सारी व कोमॉर्बिड संशयित असलेल्या 26 लाख 84 हजार 889 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. यात कोव्हिडचे 1966 तर सारी’चे 15 हजार 440 रुग्ण सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनापेक्षा सारीचा धोका अधिक असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना संशयित रुग्णांची वेळेत तपासणी व्हावी तसेच सारी’ व कोमॉर्बिड (गंभीर आजार असलेल्या) नागरिकांची माहिती मिळावी या उद्देशाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्यात आली. बीड जिल्ह्यात या मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत. या मोहिमेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात सारी संबंधी आजारांचे रुग्ण अधिक असल्याचे स्षष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाने 2205 पथके नेमून केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 4 लाख 13 हजार 539 घरातील 20 लाख 80 हजार 362 जणांपैकी 7 हजार 82 तर शहरी भागातील 1 लाख 15 हजार 979 घरातील 6 लाख 4 हजार 527 जणांपैकी 3748 अशा एकुण 10 हजार 916 जणांमध्ये सारी’ संबंधी आजार आढळून आले. दुसर्या टप्प्यातील याच लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात 3365 व शहरी भागातील 1245 अशा एकुण 2623 जणांमध्ये सारीचे लक्षणे आढळून आले आहेत. म्हणजेच मोहिमेच्या दोन्ही टप्प्यात सारी’चे 15 हजार 440 रुग्ण आढळून आले आहेत. या मोहिमेततून सारी’ व तत्सम आजार असलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे सारी
सिव्हीअर अॅक्युट रॅस्पिरेटरी इलनेस’ अर्थात सारी हा आजार श्वसनाशी संबधित आहे. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे सारीमध्ये जाणवतात. हीच लक्षणे कोव्हिडचीही आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेले या लक्षणाचे सर्व रुग्ण कोरोना संशयित गणले जातात. शिवाय कोव्हिड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेले व अशी लक्षणे असलेले बहुतेक रुग्ण सारी म्हणून ग्राह्य धरले जातात. सारीला वैद्यकीय भाषेत रोगापेक्षाही आजाराची एक वेगळी स्थिती मानले जाते. अनेकदा दमा, उच्चरक्तदाब, मधूमेह अशा व्यक्तींना श्वसनाला त्रास होतो आणि त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने त्यांची फुफ्पूसे निकामी व्हायला लागतात अशावेळी रुग्णाला धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी परिस्थिती निर्माण होते या अवस्थेला सारी म्हटले जाते.