Advertisement

सोनपावलांनी येणारा सण महालक्ष्म्याचा

प्रजापत्र | Sunday, 04/09/2022
बातमी शेअर करा

कळंब:पृथ्वीच्या पाठीवरील हरेक सुजाण व्यक्ती आपल्या जीवनात समृद्धीची अपेक्षा करत जीवन जगत असतो. मग ती समृद्धी सुखाची असेल शांतीची असेल की ज्ञान, सत्ता संपत्तीची, असेल.

 

   मानवी जीवन हे कधीही सर्वांगीण व परिपूर्ण असत नाही. जीवनातील अपुर्णता परिपूर्ण करण्याच्या अपेक्षेने जीव सातत्याने अहर्निशी  धडपडत असतो. आपल्या स्वतःच्या जीवनातील खंत देणारी अपूर्णता ज्यांच्या उपासनेने पूर्ण होऊ शकते, त्याचा शोध व बोध मानवी जीवनात जाणीवपूर्वक घेतला जातो.

 

 

   महालक्ष्मी ही देवता संपत्ती, समृद्धी, व शौर्याची जागरूक देवता मानली जाते. तिच्या स्वागतात व पूजनात आपल्या ही जीवनात विविध स्तरातील समृद्धी प्राप्त होते. ही मनोमन अपेक्षा ठेवून जीवनाला संजीवनी देणाऱ्या महालक्ष्मी (गौरी) देवीची पूजा आज सणाच्या निमित्ताने विधिवत तीन दिवस केली जाते.

 

      देवीमहालक्ष्मीचा सण हा भाद्रपद शुक्ल पक्षातील जेष्ठ नक्षत्रावरच असतो. या पवित्र दिनी घरोघरी स्त्रिया देवीचे पूजन उत्साहात व आनंदात करतात. आदल्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी लक्ष्मी गौरीचे घरात आगमन होत असताना गृहलक्ष्मी विचारते कोण आले? आवाज येतो, लक्ष्मी आली. कोणाच्या पावली आली ?पुन्हा आवाज येतो, मालकांच्या, मुलाबाळांच्या, गुराढोरांच्या, आप्तेष्टांच्या सोन पावलांने आलेल्या गौरी लक्ष्मीस घरात चौरंगावर बसून पूजा केली जाते प्रथम दिनी भाजी -भाकरीचा नैवेद्य दाखवतात ,दुसऱ्या दिवशी घरात सजावट करून बसवलेल्या देवीला पुरणपोळीसह 16 भाज्या, 16 चटण्याचे पदार्थानी केळीच्या पानावर भोजन भरवतात आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून विसर्जित केले जाते.   या सणास गौरी गणपतीचा सण, ज्येष्ठा गौरी पूजन, वरदा लक्ष्मी पूजन या विविध नावाने ओळखले जाते. चैत्रा गौरी, मंगलागौरी, गजगौरी, कनिष्ठा गौरी, ज्येष्ठा गौरी ,महालक्ष्मी ही देवीची अनेकविधरुपे वेगवेगळ्या वेळी पुजली जातात. गौरी पूजनासाठी धातूची, मातीची, खड्याची, सुगडाची, लक्ष्मी मूर्ती करून पुजली जाते.   या सणा संबंधी....... हा सण कौटुंबिक व स्त्रियांचा मानला जातो. स्त्रीशक्तीने स्त्रीशक्तीवर होणारा अन्याय संपविला यास्तव स्त्रीने स्त्रीदेवीची केलेली पूजा म्हणजे गौरी पूजान. स्त्रीशक्तीने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्या उपकाराचे केलेले पूजन म्हणजे गौरी पूजन होय.

 

   या सणा संबंधी पूर्वापार कथा सांगितली जाते की, पूर्वी कोलासुर राक्षसाने दिसेल व असेल अशा सर्व स्त्रियांचा अनन्वित त्रास देऊन छळ सुरू केला होता, कित्येक दिवसाच्या छळाला कंटाळून सर्व स्त्रियांनी सृष्टीचा सृजनशील ब्रह्मदेव, पालनहार विष्णू व उपशामक आशुतोष भगवान शंकर यांच्याकडे या संबंधी विनंती करून दुःख मुक्त करण्याची विनंती वजा याचना केली.

 

   जगाला विशेषतः स्त्रियांना त्रासदायक ठरत असलेल्या कोलासुराच्या नाश्यासाठी तिन्ही देवाने हे काम देवी गौरी 
(लक्ष्मी)कडे सोपवले, मिळालेले अवघड काम आनंदाने स्वीकारून थोड्याच दिवसात लक्ष्मीने कोलासुर राक्षसाचा युद्धात सर्वनाश करून त्यास ठार मारले स्त्रियावर होणारे अन्याय अत्याचार कमी झाले, स्त्री ही भयमुक्त झाली आणि म्हणून तत्कालीन सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन लक्ष्मीचे गुणगान गायले ,एकाच स्वरामध्ये त्या म्हणू लागल्या लक्ष्मीदेवी आमच्यासाठी आपण महान कार्य केले म्हणून तुम्ही महान आहात,  तुम्ही आमच्यासाठी देवी महालक्ष्मी आहात, म्हणून महालक्ष्मी.
   गौरी या संबंधी...... एक वेळी भगवान शंकर हिमालयावर पार्वतीला बोलताबोलता "काली "असे म्हणून गेले. काली हा शब्द पार्वतीला लागला गेला. तिच्या मनावर परिणाम झाला. देव मला असे का म्हणाले? हा विचार करता -करता ती दूर डोंगरावर ओम नमः शिवाय जप करत अनुष्ठानला बसली. बरेच दिवस तिने मौन धारण केले. भगवान शंकराच्या हि गोष्ट लक्षात आली आणि ते पार्वतीच्या जवळ जाऊन हाक मारू लागले. गौरी... गौरी... गौरी ...गौरी... गौरी म्हणून पुढे पार्वतीचे नाव गौरी पडले. गौरी ( लक्ष्म्याि) पूजन या निमित्ताने ...शब्दपुष्पांजली आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित.

      महादेव महाराज अाडसूळ ईटकुरकर.

Advertisement

Advertisement