शिक्षकाला बसला २९ लाखाचा गंडा
बीड : केबीसीच्या नावाखाली गंडविणाऱ्या टोळीने हुबेहूब स्टुडिओ बनवून व्हिडिओ तयार केला, त्याआधारे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन सावज बनविले जात असे. या भामट्यांच्या गळाला लागून २९ लाख रुपये गमावणाऱ्या शिक्षकाला अशा पद्धतीनेच फसविल्याचे समोर आले आहे. देशभर धुमाकूळ घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांची एकेक कडी शोधून साखळी ब्रेक करण्यात बीडच्या सायबर सेलला यश आले. त्यांच्या म्होरक्याला पकडण्याचे आव्हान अद्याप कायम आहे.
केबीसीची २५ लाखांची लॉटरी व महागड्या कारचे आमिष दाखवून येथील एका शिक्षकास २९ लाखांना गंडविले होते. यापूर्वी पाच जणांना अटक केली होती, या साखळीतील नेहाल जमाल अख्तर (२२, रा. जवकटीया, जि. चंपारन) व जुबेर अब्दुल हकीम (२५, रा. लालसराजा, जि. चंपारन) या दोघांना बीडच्या सायबर सेलने २४ व २५ ऑगस्ट रोजी बिहारमध्ये बेड्या ठोकल्या.
सायबरचे पो. नि. रवींद्र गायकवाड, हवालदार भारत जायभाये, पो. ना. आसेफ शेख, अन्वर शेख, विजय घोडके यांचे पथक मोठ्या शिताफीने तपासाची कडी जुळवत त्यांच्यापर्यंत पोहोचले. देशभर या टोळीने धुमाकूळ घातला होता. दरम्यान, ऑनलाइन फ्रॉडची रक्कम अमेरिका, सौदी अरेबिया, दुबई व पाकिस्तानला जात असल्याचे निष्पन्न झाले असून, १२ कोटी रुपयांच्या व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे सायबर सेलचे हे मोठे यश मानले जात आहे.
केबीसीच्या नावाखाली ऑनलाइन फ्रॉडची रक्कम वेगवेगळ्या खात्यांतून फ्लो केली जात होती, त्याची कडी शोधण्याचे काम आव्हानात्मक होते. ही साखळी ब्रेक करण्याचे काम केल्याने सायबरच्या कामगिरीची वरिष्ठांनी दखल घेतली आहे. याबद्दल मी २५ हजारांचे रिवॉर्ड तपास पथकाला जाहीर केले आहे. यातील मास्टर माइंडचाही शोध सुरू आहे.
- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड.
तपास यंत्रणांनी घेतली दखल
या प्रकरणातील फ्रॉडची रक्कम पाकिस्तानसह परदेशात गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीड सायबरने पकडलेले आरोपी विदेशातील लोकांच्या संपर्कात कसे, यादृष्टीने तपास यंत्रणा देखील चौकशी करत आहे. एटीएस, एनआयएला बीड पोलिसांनी यासंदर्भातील गोपनीय अहवाल १ सप्टेंबर रोजी पाठविला. यास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुष्टी दिली.