Advertisement

बीड जिल्हा बँकेवर येणार अशासकीय सदस्यांचे प्रशासक मंडळ

प्रजापत्र | Wednesday, 31/08/2022
बातमी शेअर करा

बीड : महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सरकारी अधिकार्‍यांसह इतर व्यक्तींचे प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. आता राज्य सरकार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असून या बँकेवर 11 सदस्यीय प्रशासक मंडळ नेमण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. यात भाजपशी संबंधीत व्यक्ती असणार आहेत. या संदर्भात दोन ते तीन बैठका झाल्या असून कोणत्याही क्षणी अंतिम निर्णय होऊ शकतो.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षीक निवडणूक झाल्यानंतर संचालाक मंडळाच्या 11 जागा रिक्त राहिल्याने बँकेवर अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. या प्रशासक मंडळाला सरकारने मुदतवाढही दिली होती. मात्र या प्रशासक मंडळाच्या संदर्भाने भाजपच्या वर्तुळात काहीशी नाराजी होती. आता राज्यातील सत्ता बदल होताच जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळात बदल करण्याच्या हलचाली देखील सुरु झाल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 11 सदस्यीय प्रशासक मंडळ नेमण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीने हलचाली सुरु झाल्या आहेत. हे 11 ही सदस्य खाजगी व्यक्ती अर्थात राजकीय कार्यकर्ते असणार आहेत. भाजप नेत्याच्या जवळच्या वर्तुळातील व्यक्तींचीच या अशासकीय प्रशासक मंडळावर वर्णी लावण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी केली जात आहे.

नवीन प्रशासक मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला ‘हाबाडा’ देण्यासाठी जिल्ह्यातील भाजपचे नेते सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीनेही याचा ‘धसका’ घेतल्याचे चित्र आहे. या संदर्भात बीड जिल्ह्यातील सहकारातील तज्ञ असलेल्या भाजपच्या एका नेत्यानेच पुढाकार घेवून सार्‍या हलचाली सुरु केल्या असून भाजपच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनीही या संदर्भात बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात अशासकीय सदस्यांची यादी अंतिम होऊन जिल्हा बँकेचा कारभार पुन्हा भाजपच्या मर्जीने चालेल असे संकेत मिळत आहेत.

 

Advertisement

Advertisement