बीड: वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरुन सायबर गुन्हेगार सामान्यांना अलगद जाळ्यात अडकवतात. यातून खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर देखील सुटले नाहीत. १९ ऑगस्ट रोजी त्यांचा फोटो व्हॉटस्अप डीपीला ठेऊन पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हॅकरने थेट पोलीस अधीक्षकांनाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे फेसबुकला वैयक्तिक अकाऊंट आहे. त्यांनी ते लॉक केलेले आहे. मात्र, मित्रयादीतील काही जणांना मेसेंजरमधून पैशांची मागणी झाली. त्यानंतर व्हॉटस्अपवर ठाकूर यांचा फोटो डीपीला ठेऊन व्हाऊचर पाठवून पैसे मागितले. सुरुवातीला काही जण गडबडून गेेले.
मात्र, मित्रयादीतील अधिकाऱ्यांनी अधीक्षकांना संपर्क साधून याबाबतची माहिती कळविल्यावर ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माझ्या फोटोचा वापर करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये, दुर्लक्ष करावे, अशी सूचना केली आहे. दरम्यान, सायबर भामट्यांनी एसपींच्या फोटाआधारे तेच असल्याचे भासवून पैसे मागितल्याने सायबर विभागाने प्राथमिक तपास सुरु केला आहे. यात गुन्हा नोंद होण्याची शक्यता असून त्यानंतर संबंधित हॅकरला शोधले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
माझा फोटो व्हॉटस्अप डीपीला ठेऊन तसेच फेसबुकवर मित्रयादीतील काहींना मेसेंजरमधून संदेश पाठवून पैशांची मागणी केल्याचे कळाले. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट करुन सूचना लिहिलेली आहे. अद्याप कोणीही संबंधितास पैसे पाठविलेले नाहीत. संबंधिताचा शोध घेतला जाईल. कोणीही अशा भूलथापांना बळी पडू नये.
- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड