अशोक शिंदे
नेकनूर दि.१९- प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत असतात.त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नागरिकांनी याआधी गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या केल्या आहेत.मात्र, आता नेकनूरमध्ये त्यांच्यासदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांनी नेकनूरजवळील कळसंबर गावकऱ्यांना शुक्रवारी (दि.१९) कीर्तनाची तारीख दिली होती,परंतु अचानक ती तारीख रद्द करण्यात आल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर गावकऱ्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत इंदुरीकर महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा,अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच तितकेच लोकप्रियदेखील आहेत. त्यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मागणी असते.याप्रमाणेच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन नेकनूरजवळील कळसंबर येथे ठेवण्यात आले होते.मात्र,इंदूरीकर महाराज यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला.यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आणि गावकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. गावकऱ्यांनी सांगितले की, इंदूरीकर महाराजांच्या किर्तनासाठी तब्बल एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र , त्यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम अचानक रद्द केल्यामुळे महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठले.