बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार आज मध्यरात्रीपासून पेट्रोल प्रति लिटर 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. बीडमध्ये आता पेट्रोलसाठी 107.56 तर डिझेलसाठी 94.04 रुपये मोजावे लागणार आहेत.
केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर 2021 व 22 मे 2022 रोजी पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यांनी राज्य शासनालादेखील कर कमी करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करुन इंधनाचे दर कमी केले होते. मात्र आपल्या राज्यात इंधनाचे दर कमी करण्यात आले नव्हते. आपल्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे आजपासून पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी दरकपातीचा निर्णय जाहीर करताना सांगितले.