Advertisement

नगरपालिका निवडणूक कार्यक्रमाचा करावा फेरविचार

प्रजापत्र | Thursday, 14/07/2022
बातमी शेअर करा

बीड : राज्यातील नगरपालिकांच्या ऑगस्टमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांबद्दल राजकीय पक्षांमध्ये असमाधान असतानाच आता प्रशासनाने देखील ऑगस्टमध्ये निवडणुका घेतल्यास अडचणी येऊ शकतात असे सांगायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात मागील काळातील अतिवृष्टीचा अनुभव आणि त्यात अडकणारी महसूलसह विविध विभागांची यंत्रणा याचा विचार करून निवडणूक आयोगाने ऑगस्टमधील नगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाचा फेरविचार करावा असे पत्रच बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे.

राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या नगरपालिकांच्या निवडणुका ऑग्युस्त महिन्यात होऊ घातल्या आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यात या निवडणुका घेण्याला अनेक राजकीय पक्ष विरोध करीत आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची अनिश्चितता हे त्यांचे कारण आहे. विशेषम्हणजे सत्ताधारी भाजपने देखील नगरपालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे.

आता या संदर्भात प्रशासनाने देखील ऑगस्टमध्ये निवडणूक घेण्याबाबत नकारघंटा वाजविणे सुरु केले आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र लिहिले असून त्यात ऑगस्टमध्ये नगरपालिका निवडणुका घेण्यातील अडचणींचा पाढा वाचला आहे. ऑगस्टमधील निवडणूक कार्यक्रमाचा फेरविचार करावा अशी विनंती करतानाच नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका घेतल्यास सोयीचे होईल अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Advertisement

Advertisement