Advertisement

आरोपी हातकडीसह फरार

प्रजापत्र | Friday, 01/07/2022
बातमी शेअर करा

कडा - अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीसांच्या तावडीतून हातकडीसह गुरुवारी सायंकाळी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली आहे. ड्रोनच्या सहाय्याने डोंगरदऱ्यात आरोपीचा शोध सुरु आहे. विकास कैलास गायकवाड असे फरार आरोपीचे नाव आहे. गारमाथा येथे लघुशंकेसाठी पोलिसांची गाडी थांबली असता आरोपी गायकवाड फरार झाला होता. 

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील विकास कैलास गायकवाड याच्यावर २०१९ साली एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा अंभोरा पोलिस ठाण्यात नोंद आहे. तेव्हापासून आरोपी गायकवाड फरार होता. बुधवारी २९ रोजी अंभोरा पोलिसांनी त्याला एका ठिकाणाहून ताब्यात घेऊन गुरूवारी ३० रोजी  बीड न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवली. पोलीस आरोपी गायकवाडला बीडवरून अंभोरा पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. सायंकाळी बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील पाटोदा तालुक्यातील गारमाथा येथे लघुशंकेसाठी पोलिसांनी गाडी उभा केली. पोलिस बेसावध असल्याची संधी साधत आरोपी विकास गायकवाड हातकडीसह फरार झाला. 

पोलिसांना शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही. त्यानंतर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह १५ ते २० अंमलदार, २० पोलिस मित्र रात्रीपासून आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, आज दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस डोंगरात आरोपीचा शोध घेत आहे. गुरूवारी रात्री आरोपीवर अंभोरा पोलिस ठाण्यात पोलिसांना चकवा देऊन पळाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

डोंगरदऱ्या, परिसर काढला पिंजून 

पोलिसांनी आरोपीच्या शोधात डोंगरकिन्ही, उंबरहिरा, तांबा राजुरी, चुंबळी परिसर पिंजून काढला आहे. तसेच येथील लहान मोठे डोंगर, गावे अंभोरा पोलिसांनी पिंजून काढली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी आरोपीची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करा असे आवाहन केले आहे.

 

 

Advertisement

Advertisement