बीड : कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना कोणी कोणी साधा फोन केला नाही, सांत्वनही केले नाही. अडचणीच्या काळात कारण नसताना अनपेक्षितपणे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले. यामुळे टीव्हीवर शिवसेनेची बातमी जरी लागली तरी माझी आई टीव्ही बंद करते. माझ्याकडे तिला समजाऊन सांगण्याचे शब्द व हिंमत पण नाही, हे काही शब्द आहेत बीडचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या भावनिक पत्रातील. त्यांनी बुधवारी (दि.२९) थेट ठाकरे यांना हे पत्र लिहले आहे.
राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ सुरू असून शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्का बसत आहे. यातच बीडचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी एक भावनिक पत्र लिहून पक्षांतर्गत नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. हे पत्र ई-मेलद्वारे उद्धव ठाकरे यांना पाठविले असून समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. यात अडचणीच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी विचारपूस देखील केली नाही . उद्धव ठाकरेंपर्यंत माहिती पोहचू दिली जात नाही असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यासोबतच टीव्हीवर शिवसेनेची बातमी जरी लागली तरी माझी आई टीव्ही बंद करते. माझ्याकडे तिला समजाऊन सांगण्याचे शब्द व हिंमत पण नाही. त्यामुळे माझं कुठं चुकलं यासाठी वर्षभर मी वरिष्ठांना सातत्याने विचारणा केली. परंतु कसलेच उत्तर मिळालं नाही. शेवटी पदे येतात जातात. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे असेही सचिन मुळूक यांनी म्हटले आहे.