माजलगाव - तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना 20 जून रोजी घडली होती. मुलीच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रुड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केलेल्या कारवाईत बीड येथील शिवाजीनगर पोलीस हद्दीत आरोपीसह अल्पवयीन मुलगी लपल्याची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना जेरबंद केले.
सदर गुन्ह्यात बलात्कारा सह पोस्को गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पिंक मोबाईल पथकाकडे दिला असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की दिंद्रुड पोलीस हद्दीतील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी तात्काळ दखल घेत मोबाईल लोकेशन वरून हे युगल बीड येथील शिवाजीनगर पोलीस हद्दीत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली. छापा टाकत अल्पवयीन मुलीला व आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई 26 जून रोजी रात्री घडली. दरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाल्यामुळे बलात्कारा सह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून माजलगाव येथील पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे,पोलीस कॉन्स्टेबल माया मस्के पुढील तपास करत आहेत.
 
                                    
                                
                                
                              
