बीड दि.२२ (प्रतिनिधी)-यंदा आषाढी वारीसाठी बीड जिल्ह्यातून पंढरपूरला १८० बसेस धावणार असून ५ ते १४ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आगारातून या बसेस धावतील अशी माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.भाविकांची ओढ मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर बस फेऱ्या आणखी वाढविण्याचेही नियोजन राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे आषाढीवारी वर निर्बंध लादण्यात आले होते.त्यामुळे भाविकांनी पंढरपूरचा रस्ता धरला नव्हता.मात्र कोरोना विषाणूची परिस्थिती आता आटोक्यात आली असून यावर्षी पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या आगारातून बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.बीडमधून ३०,परळी २०,धारूर २०,माजलगाव २०,गेवराई २०,पाटोदा २०,आष्टी २०,अंबाजोगाई २५ अश्या १८० बसच्या फेऱ्या दिवसाला भाविकांच्या सोईसाठी करण्यात येणार असून याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी केले.
...तर गावातून धावणार पंढरपूरसाठी बस
आषाढी वारीसाठी जिल्हाभराच्या आगारातून नियोजन करण्यात आले असले तरी ४५ प्रवाशी जर एखाद्या गावातून थेट पंढरपूरसाठी प्रवास करण्यास इच्छुक असल्यास आगार प्रमुखांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.थेट ४५ प्रवाशी मिळाल्यास बस थेट पंढरपूरसाठी धावेल अशी माहिती देण्यात आली आहे.