Advertisement

लिंबगावमध्ये प्रशासनाला आणखी किती बळींची प्रतिक्षा?

प्रजापत्र | Saturday, 24/10/2020
बातमी शेअर करा

बीड : ’2012 पासून आम्ही पुलासाठी निवेदन देतोय , दरवर्षी काही तरी थातुरमातुर काम होते, थोडे पाणी आले की पूल वाहून जातो. पुन्हा गुडघ्या एवढ्या पाण्यामधून प्रवास करावा लागतो. पूल नसल्याने पाण्यात बुडून आतापर्यंत किमान 8-10 लोकांचे बळी गेले आहेत, आता प्रशासनाला आणखी किती बळी जाऊ द्यायचे आहेत ?’ हा सवाल केलाय खळवट लिंबगावचे सरपंच  भारत निसर्गंध यांनी. ’ 1988 ला पहिल्यांदा पाणी तुंबलं, तेव्हापासून दरवर्षी आमचे हालच आहेत, पण ना आमदार ना प्रशासन , कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही ’ ही  खंत येथील ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. ही खंत एकट्या लिंबगावची नाही, तर माजलगाव धरणामुळे पुनर्वसित व्हावे लागलेल्या कितीरी गावांची आहे. धरणामुळे मोठ्या भागाचे सोने झाले , मात्र अनेकांच्या नशिबी अजूनही आसवेच आलेली आहेत.
वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव येथे चप्पू पलटल्याने गुरुवारी तिघे बेपत्ता झाले होते. या गावात आतापर्यंत अशा 7-8 घटना घडल्या आहेत. गावाला माजलगाव धरणाच्या बँक वॉटरचा वेढा पडतो, गावकर्‍यांच्या जमिनी त्या पाण्याच्या पलीकडे आहेत, त्यामुळे तिकडे जायचे तर गावच्या बाजूने असलेल्या एका छोट्या पुलाचाच आधार घ्यावा लागतो. मात्र हा पूल देखील नावालाच आहे.
’2012 मध्ये हा पूल खचला,त्यावेळी गावकर्‍यांनी निवेदने दिली, मात्र प्रत्येकवेळी थातुरमातुर काम होते.पूल म्हणजे देखील नळकांड्या टाकलेल्या, त्या कधीही वाहून जातात.पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही.ही खंत गावकर्‍यांची आहे. गुरुवारचा प्रकार देखील या पुलामुळेच घडला, पूल वाहून गेलेला असल्याने लोक चप्पूत बसून शेतातून येत होते आणि तो चप्पू पलटला.किमान अडचणीच्या ठिकाणचे,दळणवळणासाठी महत्वाचे असणारे पूल तरी बांधले जायला हवेत, पण प्रशासन याकडे लक्षच देत नाही. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच गावकर्‍यांनी या भागाचे आमदार प्रकाश सोळंके यांना सुद्धा निवेदन दिले होते आणि निवडणुकीच्या काळातील आश्वासनाची आठवण करून दिली होती असे या भागातील ग्रामपंचायत सदस्य चव्हाण सांगतात  मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्षच केले. आता तरी गावकर्‍यांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे का ?

Advertisement

Advertisement