माजलगाव-जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून माजलगाव तालुक्यात आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील राजेगाव बीट हद्दीत वारोळा शिवारातील एका विहिरीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी शरीराचे तुकडे केले असावे असा अंदाज आहे.
पोलीस नाईक रवी राठोड यांच्या फिर्यादीनुसार, राजेगाव बीट हद्दीत वारोळा शिवारात शेतातील एका विहिरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एपीआय इधाटे, पोलीस कर्मचारी देवकते, राठोड, खराडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला असता तो कुजलेल्या अवस्थेत आणि अर्धवट कंबरेपासून खाली गुडघ्यापर्यंत भाग असलेला दिसून आला. त्याच्या पायजम्याच्या खिशात वेगवगेळ्या महिलांचे फोटोही आढळून आले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात बुधवारी पाठवून दिला. दरम्यान, अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नसून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरील इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यापैकी कंबरेखालचा भाग विहिरीत टाकून दिला असावा असा पोलिसांना संशय आहे. राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर माजलगाव ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.